परदेशात ऑफिस किंवा हॉटेलमध्ये स्वागत करण्यासाठी आणि छोटे-मोठे काम करण्यासाठी रोबोटचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. जगातील अनेक विकसित देशांत ह्युमनॉईड खूप लोकप्रिय आहे. हिंदुस्थानातसुद्धा लवकरच ह्युमनॉईड सर्रास पाहायला मिळू शकते. याचे संकेत काही विद्यार्थ्यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील कृष्णा इंस्टिटय़ूट ऑफ इंजिनीयरिंग अँड टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यी आणि शिक्षकांनी मिळून एक रोबोट तयार केला आहे. या रोबोटसाठी अवघे दोन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रोबोटचे नाव अनुष्का असून पाहुण्यांचे स्वागत करणे, जे जे काम सांगितले ते तत्काळ करणे यासारखी कामे अनुष्का करत आहे. सामान्य रोबोटिक रिसेप्शनिस्टला हटवून अनुष्काचा वापर आरोग्य आणि कन्सल्टेंन्सीसारख्या क्षेत्रात केला जाऊ शकतो.