हिंदुस्थानच्या नव्या दमाच्या खेळाडूंनी ग्वाल्हेरपाठोपाठ दिल्लीतही टी-20 विजयाचा धमाका केला आणि बांगलादेशची 86 धावांनी धुळधाण उडवत कसोटीप्रमाणे टी-20 मालिकाही जिंकली. हिंदुस्थानच्या 9 बाद 221 समोर बांगलादेशने 9 बाद 135 धावा केल्या. हिंदुस्थानने दुसरा सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
नितीश रेड्डी-रिंकू सिंग यांच्या धुवांधार फलंदाजीमुळे हिंदुस्थानने उभारलेले 222 धावांचे आव्हान बांगलादेशी फलंदाजांना पेलवणार नव्हतेच आणि झालेही तसेच. हिंदुस्थानच्या गोलंदाजीपुढे एकही बांगलादेशी लढला नाही, अपवाद निवृत्त होत असलेल्या महमुदुल्लाहचा.
दोन्ही सलामीवीरांचे स्वस्तात त्रिफळे उडवत हिंदुस्थानने सामना आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर बांगलादेशने विजयासाठी प्रयत्न न करता केवळ 20 षटके खेळ करण्याचा डाव सुरू केला. पहिल्या पाच षटकांतच हरलेल्या बांगलादेशने 9 बाद 135 धावा केल्या. महमुदुल्लाहने 41 धावा काढल्या. सामनावीर नितीश रेड्डीने 23 धावांत 2 विकेट टिपत आपली अष्टपैलू किमया दाखवली. वरुण चक्रवर्थीनेही 19 धावांत 2 विकेट टिपल्या.
तत्पूर्वी, ग्वाल्हेरमध्ये हिंदुस्थानने मिळवलेला विजय पाहूनच टी-20 क्रिकेटमध्येही बांगलादेश संघाला काहीही करता येणार नाही, हेच दिसून आले होते. ग्वाल्हेरमध्ये पदार्पण करणाऱ्या नीतिश कुमार रेड्डीने आपण या वेगवान क्रिकेटसाठी रेडी असल्याचे दाखवून देताना बांगलादेशी गोलंदाजीच्या अक्षरशः ठिकऱ्या उडवल्या.
अवघ्या 41 धावांत संजू सॅमसन (10), अभिषेक शर्मा (15), कर्णधार सूर्यकुमार यादव (8) यांच्या विकेट काढत बांगलादेशने सनसनाटी सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर नीतिश रेड्डीने बेधडक फलंदाजी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याला साथ लाभली रिंकू सिंगची. या दोघांनी षटकारांची फटाकेबाजी करत अवघा कोटला हलवला. दोघांनी 45 चेंडूंत शतकी भागी रचत संघाला 149 पर्यंत नेले.
नीतिशने चक्क 7 षटकार आणि 4 चौकार खेचत 29 चेंडूंत 74 धावा ठोकल्या. चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागी रचल्यानंतर ही जोडी फुटली. मग रिंकूने 26 चेंडूंत पन्नाशी गाठली. हार्दिक पंड्यानेही वेगवान 32 धावा केल्या. रियान परागने दोन षटकार ठोकले, पण शेवटच्या षटकांत फटकेबाजीच्या नादात रिशाद हुसेनला तीन विकेट मिळाल्या. तरीही हिंदुस्थानने 9 बाद 221 असा धावांचा डोंगर उभारला होता.