CWG 2022 हिंदुस्थानच्या पोरी झुंजल्या, पण ‘सुवर्ण’ हुकले; थरारक लढतीत पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान

इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानला पराभव सहन करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेला सामना 9 धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, तर हिंदुस्थानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत रविवारी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमनेसामने होता. अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 162 धावांचे आव्हान हिंदुस्थानपुढे ठेवले होते. मात्र हिंदुस्थानचा महिला संघ 152 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना फॉर्मात असणारी स्मृती मंधाने आणि महिला क्रिकेटमधील सेहवाग अशी ओळख बनवलेली शेफाली वर्मा लवकर बाद झाल्या. मात्र त्यानंतर जेमिमा रॉड्रीगेस आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी दमदार खेळ केला. दोघींनी हिंदुस्थानचा डाव 100 पार नेला. हिंदुस्थानची तिसरी विकेट 118 धावांवर गेली. मात्र यानंतर अवघ्या 44 धावांमध्ये हिंदुस्थानने सात विकेट्स आणि सोबत सामनाही गमावला. हिंदुस्थानकडून कर्णधार हरमनप्रीत हिने 65 धावांची खेळी केली, रॉड्रीगेजने 33 धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 161 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. एलिसा हिली झटपट बाद झाली. मात्र त्यानंतर बेथ मुनी आणि कर्णधार मेग लॅनिंगने अर्धशतकीय भागिदारी करत डाव सावरला. लॅनिंगने 36 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या अॅश्ले गार्डनर हिने वेगाने 25 धावा केल्या. तर बेथ मुनी हिने 61 धावा केल्या.

एकवेळ ऑस्ट्रेलिया 180 ते 190 धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु अखेरच्या काही षटकांमध्ये हिंदुस्थानने लागोपाठ धक्के दिल्याने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या रचता आली नाही. हिंदुस्थानकडून रेणुका सिंह आणि स्नेह राणा हिने प्रत्येकी दोन बळी घेतले.