
हिंदुस्थानी कुस्ती संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 15 जुलैपर्यंत नावे पाठवायची आहेत. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी सरावाला वेळ मिळाला नसल्यामुळे हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेकडे (आयओए) नावे पाठविण्यास मुदतवाढ मागितली आहे, मात्र आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून (ओसीए) अशी मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना सरावाशिवाय निवड चाचणी स्पर्धेत खेळावे लागणार आहे.
राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करीत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी त्यांच्याविरुद्ध आंदोलनाचा शड्डू ठोकला होता. या प्रदीर्घ आंदोलनाचा कुस्तीपटूंच्या सरावावर परिणाम झाला. ‘ओसीए’ने ‘आयओए’ची मुदतवाढीची मागणी फेटाळल्यास आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंसाठी हा मोठा धक्का असेल. चीनमध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी 15 जुलैपर्यंत संघ पाठविण्याची मुदत देण्यात आली आहे. बजरंग पूनिया, साक्षी मलिक, विनेश पह्गाटसह इतर काही आंदोलनकर्ते कुस्तीपटू आशियाई स्पर्धेसाठी तयारी करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या कुस्तीपटूंनी क्रीडा मंत्रालयाकडे चाचणी स्पर्धा ऑगस्टमध्ये घेण्याची मागणी केली आहे.
दीड महिना मुदतवाढ मिळणे कठीण
आशियाई ऑलिम्पिक परिषदेला (ओसीए) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 40 क्रीडा प्रकारांचे 45 देशांमध्ये प्रक्षेपण दाखवायचे आहे. अशा परिस्थितीत 40-50 दिवस मुदतवाढ मिळणे कठीण बाब आहे. 4-5 दिवसांची गोष्ट असती तर कदाचित मुदतवाढ मिळाली असती. शिवाय ‘ओसीए’ कोणत्याही देशाच्या स्थानिक राजकारणात पडत नाही. त्यामुळे कुस्ती संघाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

























































