
रशियात एका हिंदुस्थानी तरुणाला बळजबरीने सैन्यात भरतीकरून त्याला युक्रेन युद्धाच्या रणांगणात पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील हा तरुण असून त्याचे नाव बुटा सिंग आहे. तो गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये विद्यार्थी व्हिसावर मॉस्कोला गेला होता. ज्याला बळजबरीने रशियन सैन्यात भरती करत त्याला युद्धाच्या रणांगणात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुटा सिंग याने 3.5 लाख रुपये खर्च करून दिल्लीतील एका एजंटमार्फत रशियाला गेला. विद्यार्थी विजेवर गेलेला बूट सिंग मॉस्कोमध्ये काही महिने मजूर म्हणून काम करत होता. मात्र 18 ऑगस्ट 2025 रोजी रशियन सैन्याने त्याला ताब्यात घेतले आणि सैन्यात भरती केले. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बुटा सिंगने खुलासा केला की, त्याच्यासह पंजाब आणि हरियाणातील सुमारे 14 जणांना सैन्याच्या छावणीत नेऊन कोणत्याही लष्करी प्रशिक्षणाशिवाय युद्धात उतरवले जात आहे. त्याने सांगितले की, त्यापैकी पाच ते सहा जण युद्धात बेपत्ता झाले आहेत.
बुटा सिंगचा त्याच्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क 12 सप्टेंबर 2025 रोजी व्हॉट्सअॅपवरील व्हॉईस मेसेजद्वारे झाला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटला आहे. त्याच्या कुटुंबाने केंद्र सरकारकडे त्याला सुखरूप परत आणण्याची विनंती केली आहे. बुटा सिंगची आई म्हणाली की, “आम्ही आमच्या मुलाला कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी परदेशात पाठवले, पण आता त्याच्या जीवाला धोका आहे. आम्हाला तो हिंदुस्तानात परत हवा आहे.” बुटा हा शेतकरी रम सिंग यांचा एकुलता एक मुलगा असून, त्याला दोन बहिणी आहेत. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने मॉस्को आणि दिल्लीतील रशियन अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले, “आम्ही सर्व हिंदुस्थानी नागरिकांना रशियन सैन्यात सामील होण्याच्या कोणत्याही ऑफरपासून दूर राहण्याचे पुन्हा एकदा आवाहन करतो, कारण हा एक धोकादायक मार्ग आहे.”