वाढत्या महागाईचा पर्यटनाला फटका, हिंदुस्थानच्या पर्यटकांची परदेश दौऱ्याला पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून परदेशी दौऱ्याचे प्रमाण वाढत आहे. हिंदुस्थानी पर्यटक परदेशात फिरण्याला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. आकडेवारीनुसार, 2025 च्या तुलनेत पर्यटनामध्ये 6.6 टक्क्यांनी वाढ होऊन 3.3 कोटी पर्यटकांनी परदेश दौरा केल्याची माहिती आहे. दरम्यान, सौदी अरेबिया, अमेरिका आणि कॅनडा या देशांत जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षी कॅनडाला जाणाऱ्या हिंदुस्थानी पर्यटकांची संख्याही जवळजवळ 16 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानातील नागरिकांनी मायदेशात न फिरता विदेशात पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. यामागे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. हिंदुस्थानातील हॉटेलचे दर गगनाला भिडल्याने मध्यमवर्गीय पर्यटकांनी परदेशात फिरण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रॅव्हल एजंट्सच्या मते, गोवा किंवा केरळसारख्या देशांतर्गत ठिकाणांपेक्षा यूएई, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम आणि मलेशिया यांसारख्या देशात फिरायला जाणे आता परवडणारे झाले आहे.

पर्यटकांच्या तक्रारीनुसार, थायलंड किंवा व्हिएतनाम यांसारख्या देशात 5 ते 8 हजारांध्ये राहण्यासाठी चांगल्या दर्जाची हॉटेल रूम उपलब्ध होते. मात्र, हिंदुस्थानात 3 स्टार, 4 स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ऐन पर्यटनाच्या हंगामात हे दर आणखी गगनाला भिडतात. त्यामुळे मध्यमवर्गींना हे दर परवडणारे नसतात. अशी भावना वारंवार प्रवास करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हिंदुस्थानातील हॉटेल व्यावसायिकांनी या दरवाढीचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते, हिंदुस्थानात लक्झरी हॉटेल्सची मागणी जास्त असल्याने दरात कपात करण्याची सध्या गरज वाटत नाही. जोपर्यंत हॉटेल फुल्ल आहेत, तोपर्यंत विदेशी पर्यटकांच्या कमी संख्येबद्दल चिंता करण्याचे कारण नसल्याचे हॉटेल मालकांनी स्पष्ट केले आहे.