जिजामाता उद्यानात इतिहास घडला, स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर देशातल्या पहिल्या पेंग्विनचा जन्म

penguin-born-Mumbai-zoo

सामना ऑनलाईन । मुंबई

भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील पेंग्विनच्या जोडप्याने दिलेल्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडले असून त्याच्या रूपाने देशातल्या पहिल्यावहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्याचा इतिहास घडला आहे. स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून जन्माला आलेल्या या पिलाचे सर्वच स्तरातून जोरदार स्वागत झाले आहे. त्यामुळे या पिलाचे नाव हे स्वातंत्र्यदिनावरच आधारित असण्याची शक्यता आहे. पुढचे किमान दोन-तीन महिने तरी या पिलाला आईवडिलांच्या उबेची गरज असल्यामुळे त्यानंतरच मुंबईकरांना या पिलाचे दर्शन होणार आहे.

जिजामाता उद्यानातल्या पेंग्विनच्या जोड्यापैकी मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने मुंबईकरांना गोड बातमी दिली आहे. या जोडीतील मादी फ्लिपर हिने 5 जुलै रोजी आपल्या घरट्यात एक अंडे दिले होते. या अंड्यातून बरोबर 40 दिवसांनंतर 15 ऑगस्टला रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी या पिलाने जन्म घेतला आहे. अंड्याचे दिवस भरत आल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांचे लक्ष गोड बातमीकडे लागले होते.

एखाद्या पहिलटकरणीच्या बाळंतपणाची घराघरात जितकी काळजी घेतली जाते त्यापेक्षा अधिक काळजी जिजामाता उद्यानातले कर्मचारी आणि डॉक्टर आधीपासून घेत आहेत. अंड्याचे 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी पिल्लू बाहेर येईल म्हणून येथील चार डॉक्टर आणि तीन कीपर अक्षरशः डोळ्यांत तेल घालून पहारा देत होते. 15 ऑगस्टच्या सायंकाळपासून या पिलाची अंड्यातून बाहेर येण्याची धडपड सुरू झाल्याचे घरट्याजवळच्या सीसीटीव्हीतून डॉक्टरांना समजू लागले होते. त्यानंतर प्रत्यक्षात पिल्लू बाहेर आल्यानंतर 12 तास पिल्लू डॉक्टरांच्या ऑब्जर्वेशनखाली होते आणि आज सकाळी या पिलाच्या जन्माची घोषणा करण्यात आली. गेल्या 24 तासांपासून येथील कर्मचारी आणि डॉक्टरांनी घरीही न जाता या बाळंतपणाची काळजी घेतली.  

पेंग्विनसारखे दिसण्यास वेळ लागणार

भुर्‍या रंगाचे हे पिल्लू तीन ते चार इंचाचे असून त्याचे वजन 75 ग्रॅम आहे. तळहातावर मावेल एवढे छोटेसे असलेले हे पिल्लू सुदृढ असून चांगलेच ऑक्टिव्ह असल्याची माहिती पेग्विंनची देखभाल करणार्‍या डॉ. मधुमिता काळे यांनी दिली. त्यांच्या अंगावर पेंग्विनसारख्या काळ्या-पांढर्‍या स्ट्रीप्स येण्यास मात्र किमान दोन वर्षांचा अवधी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

नर की मादी?

अंड्यातून पिल्लू बाहेर आलेले असले तरी ते नर आहे की मादी हे समजण्यास अजून वेळ लागणार आहे. याकरिता पिलाची डीएनए टेस्टिंग करावे लागणार आहे. त्यामुळे लवकरच बंगळूरू येथील लाकोन्स प्रयोगशाळेत विष्ठा किंवा त्याचे एखादे पीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.  

असे करतात फिडिंग

मोल्ट आणि फ्लिपरला काही खायला दिले की त्यातले अन्न चावून थोडे पचवून ते पुन्हा या पिलाला थोडे थोडे चोचीतून देत असतात, असाही अनुभव डॉक्टरांनी सांगितला.

फ्रीडम बेबी

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी जन्मलेल्या या पिलाचे ट्विट करून स्वागत केले आहे. या पिलाचा ‘फ्रीडम बेबी’ उल्लेख करून उद्यानातील सर्व कर्मचारी, डॉक्टर आणि अधिकार्‍यांचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.