
देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोची सेवा गेल्या आठवड्याभरापासून कोलमडली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेकडो विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने किंवा विमान उड्डाणास विलंब झाल्याने प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. अर्थात झालेल्या प्रकाराबाबत माफी मागत ही गोंधळाची स्थिती पूर्वपदावर आल्याचा दावा इंडिगोने केला. तसेच इंडिगोने विमान उड्डाणे रद्द झाल्याने मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या प्रवाशांसाठी नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.
गुरुवारी इंडिगोने एक निवेदन जारी करत प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. ग्राहकांची काळजी घेण्यास आमचे प्राधान्य आहे. मात्र काही दिवसांपूर्वी विविध समस्यांमुळे रद्द झालेल्या विमान उड्डाणांसाठी आता प्रवाशांना सर्व परतावे देण्यात येत आहे.
3, 4 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी आमचे काही प्रवासी अनेक विमानतळांवर अडकले होते. त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. आमच्या समस्यांमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी आम्ही 10 हजार रुपयांचे ट्रॅव्हल व्हाऊचर देणार आहेत. हे व्हाऊचर पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील कोणत्याही इंडिगो प्रवासासाठी प्रवाशांना वापरता येणार आहे, असे इंडिगोने निवेदनामध्ये म्हटले.
कंपनीने पुढे असेही सांगितले की, ही नुकसान भरपाई सरकारी नियमांनुसार अनिवार्य असलेल्या नुकसान भरपाई व्यतिरिक्त आहे. विमान कंपन्यांना प्रवासाच्या 24 तासांच्या आत ज्यांची विमाने रद्द झाली आहेत, असा ग्राहकांना 5 ते 10 हजार रुपये द्यावे लागतात. यासह इंडिगो प्रवाशांना 10 हजार रुपयांचे ट्रॅव्हल व्हाऊचरही देणार आहे.
— IndiGo (@IndiGo6E) December 11, 2025
ज्या प्रवाशांच्या प्रवासामध्ये एकापेक्षा जास्त बदल अर्थात फ्लाईट पुन्हा पुन्हा रिशेड्यूल झाले किंवा ज्यांना विमानतळावर खूप जास्त वेळ वाट पहावी लागली अशा प्रवाशांना 10 हजार रुपयांच्या किमतीचे ट्रॅव्हल व्हाऊचर दिले जातील, असे इंडिगोने जाहीर केले. या संदर्भात प्रवाशांनी त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल नंबरवर पाठवलेले संदेश तपासावे, जेणेकरून नुकसान भरपाई आणि व्हाऊचर मिळण्याच्या प्रक्रियेत मदत होईल, असेही इंडिगोने स्पष्ट केले.























































