लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला अन् 192 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला, इंडिगोच्या विमानाचे पुण्यात इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे विमानतळावर रविवारी (15 नोव्हेंबर) सकाळी इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाची चाके आत न जाता बाहेरच अडकून राहिली. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून एकूण 192 जण होते. वेळीच आपत्काली लँडिंग केल्यामुळे दुर्घटना टळली.

इंडिगोचे 6E 0623 क्रमांकाचे विमान पुणे विमानतळावरून गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले होते. उड्डाणानंतर विमानाचे लँडिंग गिअर आत जात नसल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पुणे विमानतळ प्रशासन, हवाई दल आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. हवाई दलाकडून विमानतळावर इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि बचाव पथके धावपट्टीजवळ सज्ज ठेवण्यात आली. विमान सुरक्षितपणे उतरवण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

दरम्यान, विमानाच्या लँडिंग गिअरची स्थिती तपासण्यासाठी वैमानिकाने धावपट्टीवरून कमी उंचीवरून विमानाची फेरी मारली. यामुळे विमानाची चाके योग्य स्थितीत आहेत की नाही, याची तपासणी करण्यात आली. विमानाची गोग्य स्थिती तपासल्यानंतर सकाळी 9 वाजून 4 मिनीटांनी विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. यानंतर विमानातून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.

दरम्यान नागरिकांच्या पुढील प्रवासात अडथळा येऊ नये यासाठी इंडिगोकडून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.