इंडिया ओपनची धूळ झटकून हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू इंडोनेशिया मास्टर्ससाठी सज्ज

मायदेशात झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र ही निराशा मागे टाकत मंगळवारपासून (दि. 20) सुरू होणाऱया इंडोनेशिया मास्टर्समध्ये दमदार कामगिरी करण्याचा निर्धार हिंदुस्थानी पथकाने केला आहे.

नवी दिल्लीतील इंडिया ओपनमध्ये लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला, पण इतरांना चमक दाखवता आली नाही. पुरुष एकेरीत लिन चुन यी, तर महिला एकेरीत अन से यंग यांनी जेतेपद पटकावले. इंडोनेशिया मास्टर्समध्ये आव्हान अधिक कठीण आहे. लक्ष्य सेन जिया हेंग जेसन तेहविरुद्ध, तर एच. एस. प्रणॉय ली झी जियाविरुद्ध खेळेल. किदाम्बी श्रीकांत, थरुण मन्नेपल्ली, आयुष शेट्टी यांनाही अव्वल मानांकित खेळाडूंशी झुंज द्यावी लागणार आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू मनामी सुईझूविरुद्ध मोहीम सुरू करेल. आता या स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडू मैदान गाजवतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.