तुमची कामाची केळ संपली, कृपया घरी जा! इंदौरमधील आयटी कंपनीच्या वर्क कल्चरची होतेय चर्चा

कोरोनाच्या महामारीनंतर अनेक कंपन्यांनी आपले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कर्मचाऱयांची कपात केली आहे. अनेक कार्यालयांत कमी कर्मचाऱयांमध्ये काम करावे लागत आहे. ऑफिसमध्ये काहींना कामाचा इतका ताण असतो की, वेळेपेक्षा जास्त वेळ थांबून काम करावे लागते. काहींना तर घरी गेल्यावरदेखील ऑफिसच्या कामासाठी फोन येतात, पण जरा विचार करा, ‘तुमची कामाची वेळ संपली, कृपया घरी जा…’ अशी आठवण कंपनीनेच तुम्हाला करून दिली तर… सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात एका तरुणीच्या डेस्कटॉपवर ‘तुमच्या शिफ्टची वेळ संपलेली आहे. तुमचा कॉम्प्युटर 10 मिनिटांमध्ये बंद होईल. कृपया घरी जा’, असे लिहिले आहे. ही पोस्ट शेअर करत कर्मचारी महिलेने लिहिले आहे की, ‘आमच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱयांच्या आयुष्य आणि काम यांच्यातील संतुलन राखले जाते. शिफ्ट संपल्यानंतर काम केल्यास आमचा कॉम्प्युटर आपोआप बंद होतो.’ आपल्यालाही अशा कंपनीत जॉब मिळायला हवा, अशी इच्छा नेटिझन्सने व्यक्त केली आहे.