
सामना ऑनलाईन । इंदूर
इंदूरमध्ये एका दुकानदाराला बातमी छापण्याची धमकी देऊन पैसे मागणाऱ्या बोगस पत्रकारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अधिमान्य पत्रकाराचे बोगस ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी बोगस पत्रकारांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना बोगस कार्ड बनवून देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
इंदूरमधील श्रीनगर काकड भागातील एका ज्यूस विक्रेत्याला धमकावून बोगस पत्रकार त्याच्याकडे पैशांची मागणी करत होते. ते बोगस पत्रकार या ज्यूस विक्रेत्याकडे आले. त्यांनी अधिमान्य पत्रकार असल्याचे सांगत दुकानाचे फोटो आणि व्हिडिओ काढले. आम्हाला पैसे दे नाहीतर या दुकानाची बातमी छापून दुकान बंद करू अशी धमकी त्यांनी दुकानदाराला दिली. दुकानदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपास करून खजरानी काकड येथील मोहम्मद इशाहक आणि श्रीनगर काकड येथील अब्दुल खान यांना अटक केली. त्यांच्याकडून मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात येणारी अधिमान्य पत्रकार असल्याची बोगस ओळखपत्रही जप्त करण्यात आली आहेत.
ही ओळखपत्रे मालवा श्रमजीवी पत्रकार संघाद्वारे जारी करण्यात आल्याचे बोगस पत्रकारांनी सांगितले. मध्य प्रदेशच्या जनसंपर्क विभागाद्वारा जारी करण्यात येणाऱ्या अधिमान्य पत्रकारांच्या ओळखपत्रांसारखीच त्यांनी ओळखपत्रे बनवली होती. या बनावट ओळखपत्रावर मध्य प्रदेश सरकारचा लोगोही होता. त्यामुळे ही ओळखपत्रे पाहिल्यावर कोणालाही संशय येत नव्हता. त्यांना याआधी कितीजणांना फसवले आहे, याचा तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणी बनावट ओळखपत्रे देणाऱ्यांविरोधात कोणतीही करवाई करण्यात आलेली नाही. तसेच याबाबतही तपासही करण्यात येत नसल्याने संशय व्यक्त होत आहे.




























































