उद्योगातून विज्ञान

>> शैलेश माळोदे

उद्योग विज्ञान आणि संशोधन यांचा उत्तम मेळ घालणारे डॉ. अशोक गांगुली.

‘‘मी माझं करीअर एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या उपकंपनीच्या विकास आणि संशोधन प्रयोगशाळेत वैज्ञानिक म्हणून सुरू केलं. नंतर मी उत्पादन प्रक्रियेकडे वळलो आणि नंतर त्या उपकंपनीचा हिंदुस्थानातील अध्यक्ष झालो.’’ ही बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे युनिलिव्हर लि. आणि तिची हिंदुस्थानी उपकंपनी म्हणजे हिंदुस्थान युनिलिव्हर लि. आणि 1980 ते 90 या दशकात तिचे अध्यक्ष होते डॉ. अशोक शेखर गांगुली (ए.एस. गांगुली). ‘बिझनेस ड्रिव्हन रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक खूप गाजलं. एक यशस्वी कॉर्पोरेट व्यवस्थापक असूनही संशोधन हा मुख्य पिंड असलेल्या या वैज्ञानिकाशी झालेला संवाद हा एक ‘नो नॉनसेन्स’ प्रकारातला होता.

उद्योगक्षेत्रातील आर ऍण्ड डी किंवा विकास आणि संशोधन कार्य आपल्या देशात फारसं होत नसताना त्याचं महत्त्व विशद करणारं पुस्तक लिहून डॉ. अशोक गांगुली यांनी हा विषय चर्चेत आणण्याचे काम तर केलंच, परंतु त्याद्वारे या क्षेत्राला एक नवी दिशा दिली. ते म्हणतात, ‘‘तथाकथित उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱयांसहित कुठल्याही उद्योगातील व सीईओ आणि वरिष्ठ अधिकारी आर ऍण्ड डीविषयी चर्चा करण्यास अनुत्सुक असतात. याचं मूळ 1970 आणि 80च्या दशकातील काँग्रेस सरकारच्या धोरणात आहे. कारण त्या काळात केवळ आयातीस पर्याय शोधणं, रिव्हर्स इंजिनीअरिंग म्हणजे ‘आर ऍण्ड डी’ होतं. आता मात्र थोडा फरक पडल्याचं दिसून येतं. अर्थात अमेरिका आणि युरोपमध्येदेखील या दोन दशकांत संशोधनास कॉर्पोरेट संस्कृतीत फारसं महत्त्व दिलं जात नसे. जेव्हा 1990 साली मी युनिलिव्हरच्या संचालक मंडळावर माझी संशोधन आणि तंत्रज्ञानविषयक जबाबदारी देऊन नियुक्ती झाली तेव्हा मला धंदा आणि संशोधन यांच्या कंपनीतील संघर्षाची कल्पना आली.

28 जुलै 1935 रोजी शेखर नाथ आणि विनापती गांगुली या दांपत्याच्या पोटी पाटण्याला डॉ. ए. एस. गांगुली यांचा जन्म झाला. मास्टर टय़ुटोरियल हायस्कूल, मुंबई येथे त्यांचे शालेय शिक्षण पार पडलं. जयहिंद कॉलेजमधून बीएस्सी केल्यानंतर त्यांनी अमेरिकेस प्रयाण केलं आणि 1959 साली एम.एस. आणि 1961 साली पीएच.डी. पदवी इलिनॉय विद्यापीठातून अन्न विज्ञान आणि मानवी पोषण विभागातून प्राप्त केली. त्यांनी जवळपास 35 वर्षे युनिलिव्हर पीएलसीमध्ये काम केलं. निवृत्तीनंतर त्यांनी आयसीआय इंडिया, ब्रिटिश एअरवेज, विप्रो, एलआयसीसहित विविध कंपन्यांच्या संचालक मंडळांवर सदस्य म्हणून काम केलं. कॉर्पोरेट क्षेत्राबरोबरच त्यांनी विविध देशांच्या शासकीय सल्लागार मंडळे आणि समित्यांवर काम केलं. हिंदुस्थानच्या पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून 1985 ते 1989 यादरम्यान काम केलं. ते ब्रिटनच्या यूके ऍडव्हायसरी बोर्ड ऑफ रिसर्च कौन्सिल्सचे (1991 ते 94) सदस्य होते. 1995 साली ते बंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्चचे मानद सदस्य म्हणून निवडले गेले. 1991 मध्ये ते रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे फेलो म्हणून निवडले गेले. 2006 साली त्यांना ब्रिटनने सीबीई या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. हिंदुस्थान सरकारने 1987 साली पद्मभूषण आणि 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

डॉ. गांगुली औद्योगिक संशोधन कार्याविषयी खूपच ‘पॅशेनेट’ असून याबाबत ते नेहमी आग्रह धरताना दिसतात. आपल्या अनुभवाविषयी मोकळेपणाने बोलताना ते म्हणाले, ‘‘मी अत्यंत नशीबवान आहे. कारण मला संशोधनासंदर्भात खूपच आस्था असणारे वरिष्ठ सहकारी लाभले. त्यामुळे बिझनेस आधारित औद्योगिक आणि सांस्कृतिक सीमारेषा ओलांडून जाणारी ‘सीमाविरहित प्रयोगशाळे’ची संकल्पना जन्माला येताना मी ती प्रक्रिया अनुभवू शकलो. कदाचित ही गोष्ट आता कदाचित तितकीशी नवीन वाटणार नाही.’’

आता बऱयाचदा कंपनीत कार्यरत असणाऱयांना बिझनेस आधारित संशोधन आणि विकास प्रक्रियेशी स्वतःला जोडून घेणं सोपं झालंय. कारण आता ही गोष्ट धंद्याशी निगडित आणि त्याच्या उद्दिष्टांसाठी आहे. श्रेणीबद्ध संघटनेपेक्षा प्रकल्पाधारित टीम्समधून काम करण्यामुळे वैयक्तिक संशोधकांना प्रत्येक स्तरावरील जबाबदारी आणि भूमिका निश्चितपणे कळू लागलेली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असणाऱया प्रत्येकाला, मग ते संशोधन प्रयोगशाळेतील असो वा ऑपरेटिंग कंपनीतील, एक वेगळंच प्रोत्साहन लाभलंय. यात डॉ. गांगुलीसारख्यांच्या दिशानिर्देशनाचा खूप मोठा वाटा आहे.

डॉ. अशोक गांगुली राष्ट्रीय ज्ञान आयोगाचेदेखील सदस्य होते. राज्यसभेवर नामित सदस्य म्हणून त्यांनी 2009 ते 2015 यादरम्यान काम करत महत्त्वाचं योगदान दिलं. ते म्हणतात, ‘‘माहिती तंत्रज्ञानाच्या जलद प्रसारामुळे बिझनेस आधारित आर ऍण्ड डीवर खूपच योग्य प्रभाव पडलाय. त्यामुळे अगदी ‘डायनॅमिक इनोव्हेशन संस्कृती’ सर्वत्र मूळ धरताना दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीच्या उपकंपन्या एकमेकांशी जोडल्या जाऊन भौगोलिक विस्तार मजबूत झालाय. तसंच आयटीमुळे कार्यन्वयनही सोपं झालंय. आता एखाद्या कंपनीसाठी संशोधन विभाग आणि प्रक्रिया निर्माण करण्यासाठीची मानकं बऱयापैकी सिद्ध झालीत. तंत्रज्ञान आणि नवं ज्ञान यामुळे सर्वच उद्योगक्षेत्रं अगदी ढवळून निघत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा आणि क्वांटम कम्प्युटिंगचे पडघम आता संपूर्ण क्षेत्रात उमटू लागले आहेत. अशावेळी उद्योगांनी आपलं सामाजिक दायित्व मात्र लक्षपूर्वक निभवायला हवं. तरच ते ‘लंबी रेस का घोडा’ ठरू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या