नवरात्रोत्सवात महागाईचे घट बसले, पूजासाहित्य दरात 20 ते 30 टक्के वाढ

231

पितृपंधरवडा संपल्यानंतर घटस्थापनेपासून शहरातील बाजारपेठा पुन्हा एकदा ग्राहकांच्या गर्दीने हळूहळू फुलल्या आहेत. आर्थिक मंदीची झळ नवरात्रोत्सवालादेखील बसली असून पूजा साहित्यापासून उपवासाचे पदार्थ, साड्या, ऑक्सिडाईज्ड दागिने अशा वस्तूंच्या दरात सरासरी 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे. एकंदरीत यंदाच्या नवरात्रोत्सवात महागाईचे घट बसले असून बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत असली तरी खरेदीसाठी उत्साह मात्र ग्राहकांमध्ये म्हणावा तसा नाही.

नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. घटस्थापनेसाठी लागणार्‍या हार-फुले अशा साहित्यांपासून विविधरंगी साड्या, घागरा-चोली, ऑक्सिडाईज्ड दागिने, सौंदर्यप्रसाधने तसेच उपवासासाठी लागणार्‍या अशा साहित्यांनी दादर, भुलेश्वर, मालाड, बोरिवली येथील बाजारपेठा सजल्या आहेत. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे त्यातच महिनाअखेर सण आल्याने उत्सव साजरा करायचा कसा, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहे.

झेंडू शंभरी गाठणार

एरव्ही 40 रुपये किलो असणार्‍या झेंडूच्या फुलांचा दर नवरात्रोत्सवामुळे 60 ते 80 रुपयांवर पोहोचला आहे. दसर्‍यापर्यंत झेंडूचा दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचणार असल्याचे दादरच्या ‘आमले फ्लॉवर स्टॉल्स’चे पांडुरंग आमले यांनी सांगितले. देवीला आवडणार्‍या कमळाच्या फुलांचा दर देखील 180 रुपये डझनावर पोहोचला आहे.

ग्राहकांचाव्हॅल्यू फॉर मनीपॅटर्न

आर्थिक मंदीचा मोठा फटका सध्या व्यापार्‍यांना बसतोय. त्यातच सातत्याने पडणारा पाऊस आणि पितृपंधरवडा यामुळे गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत यंदा आमचे सरासरी 20 टक्के नुकसान झाले आहे. नवरात्रीत विविधरंगी साड्या खरेदीसाठी महिलावर्गाची गर्दी होत असली तरी डिझायनर कपडय़ांकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. पैशांची बचत होईल आणि नेहमी वापरता येतील अशा साड्या, ड्रेस निवडीकडे त्यांचा कल आहे, असे ‘फॅब्रिको स्टोअर्स’चे रवीश लिलानी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या