कांदे, टॉमेटो यांच्यासह खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने गृहिणींचे बजेट आधीच कोलमडले आहे. या महिन्याच्या अखेरीस दिवाळी सुरू होतेय. दिवाळी म्हटली की, नव्या वस्तूंची खरेदी आपसूकच येते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. मात्र यंदा चित्र वेगळे आहे. लोकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारखी महागडी खरेदी कमी केली आहे किंवा पुढे ढकलली आहे. महागाईने उत्सवाची मजा फिकी केली आहे. ऑक्टोबर महिन्यातील नवरात्रोत्सवापासून फेस्टिव्हल सीझन सुरू झाला आहे. मात्र तरीही म्हणावी तशी शॉपिंगची चमक दिसून येत नाहीये. रॉयटर्सच्या अहवालानुसार, या वर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि होम अप्लायन्सच्या विक्रीचा वेग एकदम कमी आहे. येत्या दिवसांत विक्रीचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महागाईने कंबरडे मोडले
रिझर्व्ह बँकेने वर्ष 2024-25 मध्ये आर्थिक विकास दर 7.2 टक्क्यांपेक्षा अधिक होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र ऑटो सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग, पर्जेजिंग मॅनेजर इंडेक्ससारखे हाय इंडिकेटर्स आणि जीएसटी संकलनाचे आकडे अर्थव्यवस्थेत कमजोरीचे संकेत देत आहेत. त्यात महागाईची भर पडली आहे. खाद्यपदार्थ आणि भाज्यांच्या किमती वाढल्याने सप्टेंबर 2024 मध्ये महागाई दर 5.94 वर पोहोचला, तर खाद्य महागाई दर 9.24 टक्के आहे. भाजीपाल्याचा महागाई दर 36 टक्के राहिला.