
नेपाळमधील परिस्थिती अलिकडेच बिघडल्यानंतर, अत्यंत वेदनादायक गोष्टी आता समोर येत आहेत. नेपाळची सद्यपरिस्थिती पाहता आता देशामध्ये महागाईचा भडका उडाला आहे. काठमांडू आणि आसपासच्या भागात अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडत आहेत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नेपाळमध्ये साधी चपातीही चढ्या किमतीत विकली जात आहे. वृत्तांनुसार, नेपाळमधील परिस्थिती बिघडल्यानंतर, स्थानिक बाजारपेठा आणि हॉटेल्समध्ये साध्या चपातीची किंमत 60 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. साधारणपणे नेपाळमध्ये ही किंमत 10 ते 20 नेपाळी रुपयांच्या दरम्यान असायची.
नेपाळमध्ये सध्याच्या घडीला भाज्यांपासून ते इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर हे चढे झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना उदरनिर्वाह करणे हे मुश्कील झाले आहे.
सध्याच्या परिस्थितीमुळे सामान्य लोकांसाठी ही जीवनावश्यक वस्तू देखील महाग झाली आहे. हिंदुस्थानात बहुतेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये एक साधी चपाती 5 ते 10 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. हिंदुस्थानच्या तुलनेत नेपाळमध्ये सध्या सहा ते दहा पट महागाई वाढली आहे.
नेपाळमध्ये Gen Z च्या आंदोलनानंतर अनेक मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळेच अन्नपदार्थांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाले आहे. नेपाळची बाजारपेठ ही प्रामुख्याने पर्यटकांच्या मागणीवर अवलंबून असते. त्यामुळेच आता झालेल्या आंदोलनानंतर स्थानिकांनाही जीवनावश्यक गोष्टींसाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे.