कृषिमंत्री सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा चौकशीचा अहवाल, आता तरी कारवाई करणार का? रोहित पवार यांचा सवाल

राज्यात शेतकरी संकटात सापडला असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात पत्ते खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कोकाटेविरोधात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी या मुद्द्यावर आवाज उठवत कोकाटेंवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच आपण पत्ते खेळत नसून आलेली जाहिरात बाजूला करत होतो, अशी सारवासारव कोकाटे यांनी केली होती. मात्र, विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आला असून त्यातून सत्य उघड झाले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदंचद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला सवाल केला आहे.

याबाबत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कृषिमंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.