
सामना ऑनलाईन, मुंबई
आता वैद्यकीय विमा सुरक्षेमध्ये मानसिक आजाराचाही समावेश करण्यात येणार आहे. विमा क्षेत्रासाठी नियम आणि कायदे बनवणारी संस्था ‘इरडा’ म्हणजेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांना मानसिक आजारासाठीही विमा सुरक्षा कवच देण्याचे निर्देश दिले आहेत.
मानसिक आजाराने ग्रस्त लोकांकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन आणि त्यांचा आजार बरा करण्यासाठी एक आर्थिक मदत म्हणून ‘इरडा’ने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
कुठले लाभ मिळणार
मानसिक आरोग्य कायद्यानुसार मिळणाऱ्या विमा सुरक्षेअंतर्गत संबंधित रुग्णांना आजारावरील निदान, अॅनालिसीस, उपचार आणि रुग्णाला आजारातून पूर्ण बरे करणे इत्यादी गोष्टींचा लाभ मिळणार आहे.
मानसिक आजारासाठी विमा सुरक्षा कवच मिळाल्यामुळे संबंधित मनोरुग्णाला चांगली वागणूक मिळेल. त्यालाही सन्मानजनक जीवन जगण्याची संधी मिळेल. तसेच समाजात मानसिक आजारांबद्दल जागरूकता निर्माण होईल, असे सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या प्रमुख अधिकारी ज्योती पुनिया यांनी सांगितले.
























































