निलेश लंके यांचे सहकारी अॅड. राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या 24 सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला.
राहुल झावरे यांच्यासह प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे, कारभारी पोटघन, दादा शिंदे, बापू शिर्के, बाजीराव करखीले, किशोर ठुबे, दीपक लंके, दत्ता ठाणगे,लखन ठाणगे, अक्षय चेडे, बंटी दाते, श्री गंधाक्ते, संदेश बबन झावरे यांच्यावर 7 जुलै रोजी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे 6 जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या वतीने नगरच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने अॅड. सतिश गुगळे, अॅड. अभिषेक भगत, अॅड. अरूण बनकर, अॅड. गणेश कावरे, अॅड. स्नेहा झावरे यांनी काम पाहिले. घटना 6 जुलै रोजी घडलेली असताना गुन्हा मात्र 7 जुलै रोजी पारनेर ऐवजी नगर येथे उशिरा दाखल करण्यात आला. तक्रारीत नमुद केलेल्या तारखेला घटना घडली होती. त्याच दिवशी या तक्रारीतील आरोपी अॅड. राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यासंदर्भात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यास विरोध करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तसेच या गुन्हयास राजकीय रंग असल्याचे आरोपींच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी न्यायालयापुढे विविध आरोपी घटना घडली, त्यावेळी कोणत्या ठिकाणी होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज, या तक्रारीतील आरोपी राहुल झावरे यांना झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ तसेच ते अजूनही अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याबाबतच्या बाबी वकीलांनी न्यायालयापुढे मांडल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना अंतरीम जामीन मंजूर केला.