राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत गटबाजी !

30
ncp logo

गोरख तावरे । कराड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत संघर्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील तीन ‘राजां’मध्ये जोरदारपणे संघर्ष सुरू झाला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राजेशाही मोडीत काढली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा सातारा जिल्ह्यात राजेशाही प्रस्थापित केली अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी घेतलेल्या संघर्षाच्या भुमिकेमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला ऊत आला आहे. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सातारा जिल्ह्यातील आमदारांशी संघर्ष करू लागले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार घालून चार आमदारांनी प्रथम बंड केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निमंत्रण आमदारांनी झुगारून दिले होते. खासदार म्हणून उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका आमदारांनी घेतल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्व ठिकाणी राष्ट्रवादीच दिसून येत आहे. अंतर्गत गटबाजीमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीला आता घरघर लागली आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी कोलमोडू पाहत आहे. अशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांना भिती वाटू लागली आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खासदार उदयनराजे भोसले विरूध्द राष्ट्रवादीचे आमदार असा संघर्ष उभा राहिला आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात प्रारंभी संघर्ष सुरू झाला. तर आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी वाद सुरू करून उदयनराजेंनी एकाचवेळी दोघांशी कटुता घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारणातील संघर्ष वाढू लागला आहे. आरोप प्रत्यारोप हे तर नित्याचेच सुरू आहेत. खासदार उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून मिळणारे लोकसभेचे तिकिट गमवावे लागण्याची शक्यता आहे, अशी सातारा लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंच्या भुमिकेविषयी नाराज आहेत. ही नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापर्यंतही आमदारांनी पोहोचवली होती. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील कार्यक्रमांना भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले होते. दरम्यान, शरद पवार यांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत गटबाजीने जोर धरला आहे. तर राजघराण्यातील वाढणारा संघर्ष यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या