आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन स्पर्धा; अहमदचा प्रशांतला पराभवाचा धक्का

365

आजवर फारसा परिचित नसलेल्या नागपूरच्या इर्शाद अहमदने आपल्या कारकीर्दीतला पहिला आंतरराष्ट्रीय किताब जिंकताना हिंदुस्थानच्याच विश्वविजेत्या प्रशांत मोरेचा तीन सेट चाललेल्या अटीतटीच्या लढतीत 3-25, 25-14 आणि 25-24 असा पराभव केला. अशा रीतीने 8 व्या आंतरराष्ट्रीय कॅरम  फेडरेशन चषक स्पर्धेचा मुहूर्त साधत इर्शादने आपल्या आगमनाची जणू नांदीच केली. तो या स्पर्धेमधला जायंट किलर ठरला. इर्शादला आजपर्यंत केवळ एकच राष्ट्रीय विजेतेपद जिंकता आले होते. हीच त्याची जमेची बाजू होती. महिला गटात एस. अपूर्वाने अजिंक्य होण्याचा मान संपादन केला.

महिलांमध्ये एस. अपूर्वाने काहीशा अनपेक्षितपणे अंतिम फेरीत पोहचलेल्या आयेशा साजिदवर महत्प्रयासाने 10-25, 25-22 आणि 25-6 अशी मात केली. आयेशाने दुसरा सेट 22-9 अशा आघाडीनंतर हातचा गमावला त्यापाठोपाठ सामना देखील. अपूर्वाने मिळालेले जीवदान साजरे करताना तिसऱ्या सेटमध्ये जी 20-0 अशी केवळ तीन बोर्डात आघाडी घेतली तेथेच विजेतेपदाचा निकाल स्पष्ट झाला. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ अखिल भारतीय कॅरम महासंघाचे कार्याध्यक्ष गिरीश व्यास यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर, महासचिव व्ही.डी. नारायण तसेच महाराष्ट्र कॅरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा, महासंघाचे सचिव भारती नारायण, कोषाध्यक्ष अरुण केदार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, सचिव यतीन ठाकूर, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव नंदू सोनावणे हे मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या