आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका

427

विश्वविजेते प्रशांत मोरे आणि एस. अपूर्वा यांच्या अप्रतिम खेळाच्या बळावर हिंदुस्थानने अनुक्रमे श्रीलंका आणि मालदीवर 3-0 असे सफाईदार विजय नोंदवत आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.

ही स्पर्धा पुण्याच्या पीवायसी जिमखान्यावर सुरू असून कॅरमच्या पाठीराख्याना आज अव्वल दर्जाचा खेळ पाहावयास मिळाला. पुरुष स्पर्धेच्या एकेरीमध्ये प्रशांत आणि निशांत फर्नांडो (2012 चा विश्वविजेता) यांच्यातली लढत चांगलीच रंगली. अखेरीस प्रशांतने ही लढत थेट 25-21 आणि 25-7 अशी जिंकली असली तरी निशांतने त्याला चांगलेच झुंजवले. दुसऱया एकेरीमध्ये झहीर पाशाने विजय मिळवून देताना शाहिद इल्मीचा 25-10 आणि 25-16 असा पाडाव केला. बांगलादेशने मालदीवला 2-1 ने पराभव करून कास्य पदक पटकावले.

महिलांमध्येही रश्मी कुमारी या गत जगज्जेत्या खेळाडूला मालदीवच्या अमिनाथ विधाध हिच्या विरुद्ध सुरुवातीला संघर्ष करावा लागला, मात्र रश्मीने सुरुवातीला 25-10 अशी आघाडी प्रस्थापित केल्यानंतर अमिनाथचा 25-0 असा दुसऱया सेटमध्ये धुव्वा उडवला. अपूर्वासमोर अमिनाथ विषमा पूर्णपणे निष्प्रभ ठरली. अपूर्वाने हा सामना 25-5, 25-5 असा जिंकला. दुहेरीत आयेशा साजिद आणि के. नागज्योती या हिंदुस्थानी जोडीने मालदीवच्या अमिनाथ सुबा आणि फातीमात रायना यांचा 25-8 आणि 25-14 असा पराभव केला. तिसऱया क्रमांकाच्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाने बांगलादेशला 3-0 असे हरवून कास्य पदक जिंकले.

या स्पर्धेला आयुर्विमा महामंडळ, ओएनजीसी, इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम आणि बँक ऑफ महाराष्ट्र या सार्वजनिक कंपन्यांकडून पाठबळ लाभले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा, कार्याध्यक्ष भारत देसडला, मानद् सचिव यतीन ठाकूर, उपाध्यक्ष अरुण केदार, पुण्याचे सचिव नंदू सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या