राज्य सरकारचा आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव, मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने जाहीर

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी या वर्षीपासून राज्य सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून मुंबईत तीन दिवस हा चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे.

राज्यात गेल्या 60 वर्षांपासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना 10 लाखांपासून 4 कोटींपर्यंत राज्य सरकार अर्थसहाय्य करते. या वर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सांस्पृतिक मंत्री आशीष शेलार यांनी दिली. दरम्यान, यावेळी 60 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि बाल कलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट प्रेक्षकांशी संवाद साधेल. यानिमित्त काही विशेष परिसंवाद आणि या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती होतील. याबाबतच्या तारखा आणि नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपटरसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्पृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने
सन 2022 या वर्षातील 60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. त्याशिवाय इतर विभागातील पुरस्कारही जाहीर करण्यात आले.