
दक्षिण आशिया लवकरच जागतिक विकासाचे केंद्र बनेल, 2040 पर्यंत जगाच्या विकास दरात दक्षिण आशियाचे एकतृतीयांश योगदान असेल व याचे नेतृत्व हिंदुस्थान करेल अशी भविष्यवाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) रविवारी आपल्या अहवालातून केली. आयएमएफने रविवारी नवी दिल्लीमध्ये शाश्वत विकासाची रूपरेषा सादर केली.
दक्षिण आशियात हिंदुस्थानसह बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मालदीव या देशांचा समावेश आहे. आशियातील इतर क्षेत्रांच्या तुलनेत दक्षिण आशिया जागतिक विकासाचे केंद्र बनण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करीत आहे. येथे काम करणाऱया तरुणांची मोठी फौज असल्यामुळे विकासाला जलदगती मिळाली असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. महसुलात वाढ, व्यापारविषयक उदार धोरण तसेच प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला चालना हीदेखील विकासाचा वेग वाढण्यामागील कारणे असल्याचे आयएमएफने नमूद केले आहे.
विकासाच्या वाटेतील अडथळे दूर करण्यास हिंदुस्थान सक्षम
आयएमएफने हिंदुस्थानच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. विकासाच्या वाटेवरील अडथळे दूर करण्यास हिंदुस्थान सक्षम आहे. देशात आधीपासूनच चांगली शिक्षण व्यवस्था राबवली गेली आहे. आता मॅन्युफॅक्चरिंगकडे लक्ष दिले गेले पाहिजे. खासगी क्षेत्रात विकासासाठी चांगले वातावरण तयार केले पाहिजे असे आयएमएफने सूचित केले आहे.

























































