हिंदुस्थानातील सुधारणांमुळे डिजिटलायझेशनचे फायदे दिसले- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

हिंदुस्थानात काही सुधारणा झाल्या आहेत. त्यावरून तेथे संगणकीकरणाचा खूपच मोठा फायदा उघड झाल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे. डिजिटलायझेशनमुळे हिंदुस्थानात फसवणुकीच्या प्रकारांना तसेच मनमानी कारभाराला बऱ्याच अंशी आळा बसला आहे असेही नाणेनिधीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

नाणेनिधीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हिंदुस्थान आणि इंडोनेशियामध्ये कल्याणकारी योजनांसाठी ‘ई-खरेदी’ची सुरुवात झाल्यामुळे स्पर्धा वाढली आणि त्यामुळेच तेथील वस्तूंच्या गुणवत्तेमध्येही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जागतिक बँकेसोबत होणाऱ्या बैठकीआधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपला हा अहवाल सादर केला आहे.
घोटाळेही कमी झाले

हिंदुस्थानात सामाजिक मदत कार्यक्रमांत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर व्हायला लागल्यामुळे तेथील खर्चात 17 टक्क्यांची घट झाली. असे असले तरी या कार्यक्रमांद्वारे देण्यात येणारी मदत मात्र तेवढीच दिली जाते. याप्रमाणेच आंध्र प्रदेशात विशिष्ट कार्यक्रमांच्या अंतर्गत गरजवंतांना दिल्या जाणाऱ्या लाभांमध्ये घोटाळा होत होता. मात्र तेथे स्मार्ट आयडी कार्डचा वापर सुरू झाल्यामुळे हे घोटाळे 41 टक्क्यांनी कमी झाल्याचेही नाणेनिधीने स्पष्ट केले.