
अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक विमान दुर्घटना समोर आली आहे. खासगी विमान कोसळून खासदारासह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 13 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सचा समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आगामी निवडणुकीतील एका उमेदवाराचाही समावेश आहे.
कोलंबिया-व्हेनेझुएला सीमेवर ही घटना घडली. कोलंबिया-व्हेनेझुएला सीमेजवळील नॉर्टे दे सँटान्डर प्रांतात बुधवारी सॅटेना एअरलाइन्सचे बीचक्राफ्ट 1900डी हे व्यावसायिक विमान कोसळले. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमान कुकुटा येथून ओकानाकडे जात होते.
विमान कोलंबियाच्या नॉर्टे दे सँटान्डर प्रदेशातील कुकुटा येथून उड्डाण घेतले आणि दुपारी ओकाना येथे पोहोचणार होते. मात्र, लँडिंगच्या काही वेळआधी विमानाचा अचानक हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. बराच वेळ संपर्क न झाल्यामुळे, अधिकाऱ्यांनी ताबडतोब शोध मोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान व्हेनेझुएलाच्या सीमेजवळील एका दुर्गम आणि डोंगराळ भागात विमानाचे अवशेष सापडल्यानंतर अपघाताची पुष्टी झाली. यात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
कोलंबियाच्या चेंबर ऑफ डेप्युटीजचे सदस्य डायोजेनेस क्विंटेरो आणि निवडणूक उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचाही या अपघातात मृत्यू झाला. दोघेही आपापल्या राजकीय पक्षांसोबत या विमानातून प्रवास करत होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
घनदाट जंगल आणि हवामानात वारंवार होत असलेले बदल यामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळा येत होता. यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत तपास सुरू आहे.

































































