इंटरनेट बंद! आता दोन दिवस काय करायचं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

इंटरनेट ही केवळ गरज राहिली नसून ते व्यसन बनले आहे. मोबाईल फोनने तर प्रत्येकाला त्या व्यसनाच्या आहारी नेले. खातापिता, उठताबसता मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉटस्अॅप, फेसबुकसह विविध अॅप्स, गेम्स, साइटस् चाळल्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष संवाद मात्र हरवला. जगावर मोहिनी घातलेले हे इंटरनेट दोन दिवस बंद राहणार आहे. जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मुख्य सर्व्हरची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे माणसांचा तुटलेला संवाद दोन दिवस का होईना पुन्हा प्रस्थापित होईल; पण इंटरनेटचे वेड लागलेला माणूस मात्र चिडचिडा होण्याची दाट शक्यता आहे.

डोमेन नेम्स सुरक्षित, स्थिर आणि अपग्रेड करण्यासाठी ग्लोबल इंटरनेट शटडाऊन आवश्यक. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या बदलासंदर्भात तांत्रिक पूर्तता केली नसेल तर त्या कंपनीच्या इंटरनेट युजर्सना इंटरनेट ‘ऑफ’ची समस्या जाणवणार आहे. हिंदुस्थानसह जगभरात ऑनलाइन बँकिंग, एटीएम, आयटी कंपन्यांचे कामकाज यावर परिणाम होईल का, हे लवकरच स्पष्ट होईल.

हिंदुस्थानात 34 टक्के ‘नेट’करी

  •  देशात 46 कोटी इंटरनेट युजर्स आहेत.
  •  हिंदुस्थानात 33.60 कोटी लोकांकडे मोबाईल.
  •  22.60 कोटी लोकांकडून सोशल मीडियाचा वापर.
  •  जगात 400 कोटी स्मार्टफोन युजर्स.
  •  जगात सोशल मीडिया युजर्स 3.33 अब्ज.