फरार मेहुल चोक्सीविरुद्धची रेड कॉर्नर नोटीस मागे

पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून पळून जाणाऱ्या मेहुल चोक्सीविरुद्ध जाहीर केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेत असल्याचं इंटरपोलने जाहीर केलं आहे. 2022मध्ये चोक्सीविरुद्ध ही नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटिसीला चोक्सीने आव्हान देत या नोटिसीचं परीक्षण करण्याची मागणी केली होती. त्याच्या मागणीचा विचार करून इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस मागे घेतली आहे.

मेहुल चोक्सी हा 2021मध्ये त्याच्या एंटीग्वा येथील घरातून गायब झाला होता. सुरुवातीला तो स्वतःच फरार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, त्याने इंटरपोलसमोर असा दावा केला होता की, 2021मध्ये रॉने त्याचं अपहरण केलं होतं. त्याला डोमिनिका येथे नेलं गेलं आणि तिथून हिंदुस्थानात परत नेण्याची तयारी केली होती.

त्याचा दावा मान्य करून त्याच्याविरुद्ध जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली आहे. मेहुल चोक्सी हा जर पुन्हा हिंदुस्थानात परतला तर त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी पुन्हा संधी मिळणार नाही. त्यामुळे ही नोटीस मागे घेतल असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता चोक्सी जगभरात कुठेही फिरू शकणार आहे. त्यामुळे त्याला हिंदुस्थानात परत आणण्याच्या शक्यता धुसर झाल्या आहेत.

रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय?
रेड कॉर्नर नोटीस म्हणजे एखाद्या देशातून आर्थिक किंवा तत्सम गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपीसाठी जारी झालेली नोटीस होय. इंटरपोलकडून ती जारी करण्यात येते. रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्याचा अर्थ ती व्यक्ती दोषीच आहे, असा नसून जगभरातील देशांना संबंधिताबद्दल जागरूक करणे हा असतो.