>> प्रसाद नायगावकर
जनावरांना कत्तलीसाठी कंटेनरने घेऊन जाणाऱ्या आंतरराज्यीय जनावर तस्करीचा यवतमाळमध्ये पर्दाफाश करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत 60 जनावरांची सुटका करून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे 27 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जनावरांना अवैधरीत्या चारचाकी वाहनात कोंबून तेलंगणाकडे नेत असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाला नागपूर रोडवर मडकोना येथे संशयित वाहन दिसले. वाहनाची तपासणी केली असता कंटेनरमध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबलेल्या 60 म्हशी आढळून आल्या. या प्रकरणी बिलाल अहमद अब्दुल गफार ,खालीद ऊर्फ खलील , वारीस पंचका खान , शहीद बसीर, लतीफ सनोप सुबेदीन या उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हा कंटेनर उत्तरप्रदेश येथून तेलंगणा येथे जात होता. हा कंटेनर उत्तरप्रदेशहून निघाला होता. दोन राज्यांच्या सीमा ओलांडून हा कंटेनर इथपर्यंत कसा पोहचला हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्यांचे नेटवर्कची चर्चा होत आहे. या तस्करांसोबत त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.