>>डॉ. स्ट्रेंज
ख्रिस्तोफर नोलनने कायम आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीने आणि भव्यतेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलेले आहे. ‘इंटरस्टेलर’ हा चित्रपटदेखील एक भव्य संकल्पना, विज्ञान आणि गणित यांचा भारावून टाकणारा अनुभव प्रेक्षकांना देतो. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे पण खरा नायक आहे दिग्दर्शक नोलन जो एक आगळीवेगळी अंतराळ सफर ‘इंटरस्टेलर’ मधून घडवतो.
ज्याचे नाव प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणेल असे दिग्दर्शक जगात खूप कमी आहेत. त्यातला एक महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणजे ख्रिस्तोफर नोलन. ‘प्रेस्टिज’ असो किंवा ‘बॅटमॅन’ चित्रपटाची सीरिज असो, नोलनने कायम आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीने आणि चित्रपटाच्या भव्यतेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलेले आहे. ‘इंटरस्टेलर’ हा चित्रपटदेखील एक भव्य संकल्पना, विज्ञान आणि गणित यांचा भारावून टाकणारा अनुभव प्रेक्षकांना देतो. तब्बल 1400 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानच्या चांद्रयान मोहिमेलादेखील फक्त 600 कोटींच्या आसपास खर्च आला होता.
अंतराळ आणि अवकाश यात्रा हा सगळ्यांच्या अत्यंत आवडीचा विषय. यापूर्वी अवकाशयात्रा, परग्रहांचे दर्शन अशा विषयांवर बनलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी जगभरात भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. ‘स्टारट्रक’ सारख्या चित्रपटांनी तर इतिहास रचला आहे. ‘इंटरस्टेलर’देखील आपल्याला अशाच एका थक्क करणाऱया प्रवासाला घेऊन जातो. काहीशा संथ गतीने सुरू होणारा हा चित्रपट अंतराळ प्रवासाबरोबर वेग पकडतो आणि आपणदेखील या प्रवासातले यात्री कधी बनतो हे लक्षातदेखील येत नाही. हा प्रवास अद्भुत असला तरी यातील काही वैज्ञानिक आणि गणिती संकल्पना समजण्यासाठी बराच अभ्यास करणे गरजेचे आहे.
चित्रपटाची कथा तशी सोपी आहे. अन्नधान्याच्या टंचाईमुळे पृथ्वीवर मानवजातीचे अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. अशा वेळी नासाच्या मदतीने अंतराळवीरांचा एक गट आकाशगंगेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रवास करून मानवी वस्तीसाठी योग्य अशा ग्रहाचा शोध घेतो अशी साधारण संकल्पना आहे. कथा साधीसोपी वाटत असली तरी यातील अंतराळ प्रवास हा कथेचा मुख्य विषय आहे आणि नोलनने ज्या पद्धतीने तो पडद्यावर साकार केला आहे, त्याला तोड नाही.
चित्रपटात वॉर्म होल, ब्लॅक होल, ग्रॅव्हिटी अशा अनेक वैज्ञानिक संकल्पनांचा आधार घेतला आहे. या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नोलनने नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधकांची मदत घेतली आहे. त्यामुळे थोडीशी कल्पनेची जोड दिलेल्या या संकल्पना पडद्यावर बघताना कुठेही अतार्किक असे काही जाणवत नाही. ब्लॅकहोल आणि वॉर्महोल म्हणजे नक्की काय, त्यातून प्रवास संभव आहे का आणि असल्यास तो कसा असेल हे उत्तम रीत्या समजावण्यात आले आहे. ग्रॅव्हिटी अर्थात गुरुत्वाकर्षण आणि त्याची ताकद, पृथ्वीपेक्षा भिन्न गुरुत्वाकर्षण असलेल्या ग्रहावर चालणे, वास्तव्य करणे अंतराळवीरांना कसे साध्य होते हेदेखील बघायला मस्त वाटते.
चित्रपटात अंतराळातील एका ग्रहावर घालवलेला एक तास हा पृथ्वीवरील सात वर्षांच्या कालावधी एवढा असतो असे दाखवण्यात आले आहे. या ग्रहावर समुद्र दाखवला असून त्याची लाट एक किलोमीटर एवढी उंच उसळताना दाखवली आहे. पृथ्वीवर एवढी उंच लाट उसळणे कधीही शक्य नाही. मात्र हा ग्रह ब्लॅकहोलच्या जवळ असल्याने गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कसा प्रचंड असतो आणि त्यामुळे अशा लाटा सहजपणे कशा उसळू शकतात हे पडद्यावर पाहताना भारावल्यासारखे होते.
चित्रपटात अनेक गणिती संकल्पनादेखील मांडल्या आहेत, ज्या सामान्य प्रेक्षकांना कळणे खूप अवघड जाते. काही दृश्ये ही दोन-तीनवेळा परत परत बघितल्याशिवाय नक्की काय घडते आहे, त्यामागे काय विज्ञान आहे, गणिती संकल्पना आहे हे समजणे मुश्किल आहे. मात्र असे असले तरी हा चित्रपट संपूर्ण वेळ तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो हे नक्की. नोलनच्या चित्रपटात कायम असते तशी नात्यांची गुंतागुंत, मानवी भावनांचा लेखाजोखा, एका बाजूला अत्यंत स्वार्थी प्रवृत्ती तर दुसऱया बाजूला मानवाच्या हितासाठी स्वतचे आयुष्य पणाला लावलेले लोक असे चित्रदेखील बघायला मिळते. कूपर हा नासाचा ‘पायलट’ या चित्रपटाचा नायक असला तरी चित्रपट जसजसा एकेक टप्पा पार करत जातो तसा चित्रपटातील प्रत्येक जण हा एका वळणावर नायक म्हणून पुढे येत जातो. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी असली तरी खरा नायक आहे दिग्दर्शक नोलन. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी ही अंतराळ सफर आहे हे नक्की.