आपली स्पर्धा आपल्याशीच!

‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’सारख्या दर्जेदार चित्रपटानंतर नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्गज कलाकार, श्रवणीय संगीत आणि आगळेवेगळे शीर्षक यामुळे आतापासून चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यानिमित्ताने नागराज मंजुळे यांच्यासोबत साधलेला संवाद…

 ‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल चित्रपटासाठी निवडण्यामागचे खास कारण काय?

– चित्रपटाचे शीर्षक ठरवताना ते उत्सुकता वाढवणारे असावेच, पण त्याचप्रमाणे चित्रपटाच्या आशयालादेखील न्याय देणारे असावे. नुसतीच उत्सुकता वाढवायची म्हणून आकर्षक शीर्षक नसते. जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहाल, तेव्हा तुम्हाला ते शीर्षक पटलेदेखील पाहिजे, याचाही विचार आम्ही ‘घर बंदूक बिरयानी’ हे शीर्षक ठरवताना केला. या तीन शब्दांतून तीन वेगळे फ्लेवर्स तुम्हाला लक्षात येतील.

 तुमचे चित्रपट हे वास्तववादी वाटतात, त्याविषयी काय सांगाल?
– मुळात मी या क्षेत्रात योगायोगाने आलो. आपण आपले जे काही अनुभव असतात ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आपले अनुभवविश्व व्यक्त करण्याची विविध माध्यमे असतात. मग ते कविता असो, कथा असो वा चित्रपट. त्यातून हे अनुभवविश्व मांडले जात असते. मला जे काही वाटते, ते चित्रपटासारख्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो.

 तुम्ही नवोदित कलाकारांना संधी देता, त्यामागचे कारण?
– मुळात जशी व्यक्तिरेखा चित्रपटात लिहिलेली असते, त्या व्यक्तिरेखेला योग्य अशा कलाकारालाच मी निवडतो. त्या कलाकारांकडून काम करवून घेणे ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. जर अभिनेत्याने वाईट काम केले तर तो दोष दिग्दर्शकाचा असतो आणि जर अभिनेत्याने चांगले काम केले तर त्याचे श्रेय दिग्दर्शक आणि अभिनेता दोघांचेही अर्धे-अर्धे आहे असे मी म्हणेन.

 या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱयांना काय सांगाल?
– आपले काम प्रामाणिकपणे करत रहा. आपली स्पर्धा आपल्याशीच हवी. या इंडस्ट्रीलासुद्धा चांगल्या लोकांची गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सोडू नका. तुम्हाला नक्की यश मिळेल.