आता चढाई हिंदुस्थानसाठी! कोल्हापूरचा कबड्डीपटू सिद्धार्थ देसाईचे स्वप्न

82
  • जयेंद्र लोंढे

कोल्हापूरचा मराठमोळा कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई याच्यावर यंदाच्या प्रो कबड्डी लीगच्या लिलावात सर्वाधिक 1 कोटी 45 लाखांची बोली लावण्यात आली. तेलुगू टायटन्सने त्याला आपल्या संघात घेतले. या पठ्ठय़ाचे आईवडील शेती सांभाळतात आणि भाऊ सूरज आर्मीमध्ये नोकरी करतोय. चंदगड तालुका व हुंदळेवाडी गावच्या या कबड्डीपटूशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला. यावेळी त्याने देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवून देण्याचे स्वप्न बघितल्याचे स्पष्टपणे सांगितले.

बीएससी फिजिक्स केल्यानंतरही कबड्डीकडे ओढा कसा?
लहानपणापासूनच कबड्डी या खेळाची आवड होती. पुण्यातील बाबूराव चांदेरे यांच्या सतेज संघाकडून खेळलो. या कालावधीत बक्षिसाच्या रूपात रुपये मिळत असत, पण ही रक्कम मोठी नसायची. प्रो कबड्डी लीग ही स्पर्धा आली आणि आत्मविश्वास वाढला. आता निŠसंकोचपणे कबड्डीत करीअर करायचे ठरवले.

प्रो कबड्डीने कोणता बदल झालाय?
प्रो कबड्डी लीगमुळे खेळाडूंना आता कबड्डीत करीअर करता येऊ शकते. पूर्वी असे नव्हते. कबड्डीला चांगले दिवस आलेत. खेळाडूंना ग्लॅमर मिळू लागले आहे. त्यांचा आर्थिक प्रश्न सुटलाय.

राष्ट्रीय स्पर्धेतील घोळाबाबत काय सांगशील…
गेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र व रेल्वे यामध्ये गोंधळ झाला. माझ्या प्रतिनिधित्वावरून हा घोळ झाला. पण रेल्वेने आता मला नोकरी दिलीय. पुढल्या स्पर्धेत त्यांच्याकडूनच खेळीन. महाराष्ट्रासाठी खेळायला नक्कीच आवडले असते.

प्रो कबड्डीतील लढती घराघरात बघितल्या जाताहेत. त्यामुळे पुढल्या वर्षी खेळामध्ये बदल करावा असे वाटत नाही का?
नक्कीच. प्रत्येक खेळाडूचा ‘गेम’ पटकन ओळखता येतो. त्यामुळे मला माझ्या खेळण्याच्या शैलीत बदल करावाच लागणार आहे. प्रदीप नरवालनेही पाटणा पायरेटस् या संघासाठी सातत्याने चमकदार कामगिरी केलीय. हेही विसरता कामा नये.

कोणते ध्येय डोळय़ांसमोर ठेवले आहेस?
प्रो कबड्डीच्या मागील मोसमात यू मुंबासाठी चांगली कामगिरी करता आली. यामुळे यंदाच्या लिलावात माझ्यावर मोठय़ा रकमेची बोली लागली. आता मी थांबणार नाही. हिंदुस्थानसाठी खेळण्याचे स्वप्न उराशू बाळगले आहे. या वर्षी वर्ल्ड कप होणार आहे. त्यामध्ये प्रतिनिधित्व करून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देण्याचे ध्येय मनाशी ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या