घरची चव आवडीची!

350

>> विष्णु मनोहर

नरेश बिडकर.. विविधरंगी चित्रपटांप्रमाणेच खाण्याची आवडही बहुरंगी आहे. सात्त्विक ते झणझणीत असा खाद्यप्रवास आहे…

रेश बिडकर यांची माझी पहिली भेट ही मेजवानीच्या सेटवर 10-12 वर्षांपूर्वी झाली आणि नंतर बरेच वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असल्यामुळे त्यांच्या बऱयाच आवडी निवडी जाणून घेण्याचा जवळून संबंध आला. त्यांच्या खाण्याच्या आवडी निवडी विषयी विचारले असतांना नरेशजी म्हणतात की घरातील कोणत्याची व्यक्तीने केलेलं कुठलही जेवण मला फार आवडतं. मग ती आई असो, अस्मिता असो की श्वेता, तिघांच्याही हातचं जेवणं मला फार आवडतं. त्यातल्या त्यात मला आवडतं असलेले पदार्थ म्हणजे आईच्या हातची दालफ्राय, श्वेताने केलेला चिकन मसाला आणि नागपूरी पोपट पोहे.
स्वयंपाक आपल्याला रस आहे का हा प्रश्न केल्यावर त्यांच उत्तर सकारात्मक होतं. ते म्हणजे स्वयंपाकात रुची तर आहे, पण वेळ नसतो, जेव्हा कधीही मला फावला वेळ मिळतो तेव्हा किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करण्याची आवडसुद्धा तितकीच आहे. स्वयंपाक मला दालफ्राय, पुलाव, आलूची भाजी बनवायला फार आवडतं. जेव्ही मी नागपूर, गोव्याला असतो तेव्हा माझ्या सोबत असलेले लोकं म्हणतात की अरे! आज तुझ्या हातची दालफ्राय कर!

मी आवडीने तयार केलेला पदार्थ म्हणजे टोमॅटो भात, हा पदार्थ मी मास्टर रेसीपी युटय़ुब चॅनेलकरिता तयार केलेला होता. त्याचप्रमाणे मेजवानीमध्ये जो डब्बल डेकर डोसा केला होता तोसुद्धा तितकाच आवडीचा आहे. परदेशातील खाण्याविषयी बोलायचे झाले तर तिथले पदार्थ एक-दोन दिवस आपण आवडीने खाऊ पण नंतर मात्र आपल्याला हिंदुस्थानी जेवणाची आठवण येतेच, तेव्हा हिंदुस्थानी जेवणाची चव काय असते हे सुद्धा जाणवते.
नरेशच असं म्हणणे आहे की प्रत्येकाच्या हाताला एक वेगळी चव असते, घरगुती जेवणाबद्दल सांगतांना तो म्हणाला की घरच्या जेवणाला आपली एक वेगळी चव असते, त्यात जो प्रेमाचा ओलावा असतो तो बाहेरच्या जेवणात आढळून येत नाही. पण बाहेरच्या जेवणातून आपल्याला काही गोष्टी शिकायलासुद्धा मिळतात. त्याची चव व बनविण्याची पद्धत फार वेगळी असते. बाहेरचं जेवण कधी-कधी घ्यायला हरकत नाही, त्यामुळे एक वेगळेपणा येतो. माझं खाण्याचं आवडतं ठिकाण सांगायचं म्हटलं तर नागपूरातील विष्णुजी की रसोई, असचं एक आवडतं ठिकाण म्हणजे पुण्यातील रोटी-शोटी कबाब, असे बरेच किस्से खाण्याबद्दल आहे, पण आता वेळेअभावी आपण इथेच थांबवूया इतके बोलून आमची लंच डेट संपवली.

टोमॅटे भात
साहित्य – 2 कप भात , 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून, 3 ते 4 मोठय़ा लसूण पाकळ्या, 2 टेस्पून तेल किंवा तूप, 2 चिमटी जिरे, 1/8 टीस्पून हिंग, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्ता पाने, चवीपुरते मीठ, कोथिंबीर.
कृती – कढईत तूप गरम करून त्यात सर्वात आधी लसूण घालावी. मोठय़ा आचेवर परतावे. लसणीच्या कडा गडद ब्राऊन झाल्या पाहिजेत आणि लसणीचा कच्चा वास जाऊन छान सुगंध आला पाहिजे. लसूण परतली गेली की जिरे, हिंग, हिरवी मिरची अणि कढीपत्ता घालून थोडा वेळ फ्राय करावे. चिरलेले टोमॅटो फोडणीस घालावे, बरोबर मीठही घालावे. झाकण ठेवून मोठय़ा आचेवर परतावे. टोमॅटो पूर्ण मऊ होऊन कडेने तेल सुटले पाहिजे. यात शिजलेला भात मोकळा करून घालावा आणि मिक्स करावे. टोमॅटोचा तयार मसाला सर्व भाताला व्यवस्थित लागला पाहिजे. झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. कोथिंबिरीने सजवून गरमच सर्व्ह करावे.

बटाटय़ाची भाजी
साहित्य – 3 मध्यम बटाटे, 2 टेस्पून तेल, 2 चिमटी मोहरी, 1/4 टीस्पून जिरे, 1/8 टीस्पून हिंग, 1/4 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून उडीद डाळ (ऐच्छिक), 1/2 टीस्पून आले पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून 4 ते 5 कढीपत्ता पाने 1/4 कप कोथिंबीर, बारीक चिरून, चवीपुरते मीठ 1 टीस्पून लिंबाचा रस, कोथिंबीर सजावटीसाठी
कृती – बटाटे उकडून आणि सोलून घ्यावेत. बटाटय़ाच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कढई किंवा पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, घालून फोडणी करावी. उडीद डाळ घालून ती गुलाबीसर होईपर्यंत परतावी, नंतर आल्याची पेस्ट, मिरच्या आणि कढीपत्ता घालून काही वेळ परतावे. नंतर कोथिंबीर घालून 5 ते 10 सेकंद परतावे आणि बटाटय़ाच्या फोडी घालाव्यात. नीट परतावे. चवीपुरते मीठ घालावे. पॅनवर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे. लिंबाचा रस घालून मिक्स करावे. कोथिंबीर घालून सजवावे.

दाल फ्राय
साहित्य – 1 कप हरभरा डाळ, जरुरीप्रमाणे पाणी, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 चिरलेले टोमॅटो, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 इंच लांब आले, 5 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, हळद पावडर 1/2 टीस्पून, चवीनुसार मीठ, कोथिंबीर
कृती ः डाळ स्वच्छ धुऊन घेऊन 30-40 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी.पाणी, मीठ व हळद घालून डाळ 5-6 शिट्टय़ा होईपर्यंत शिजवावी. वाफ जिरेपर्यंत थांबावे. मसूर धुऊन घ्यावेत, पाणी बाजूला काढून ठेवावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. गरम असतानाच किसलेले आले, लसूण, हिरव्या मिरच्या घालाव्यात. थोडा वेळ परतल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकावा. कांदा सौम्य तांबूस होईपर्यंत परतावे. त्यात टोमॅटो व 1 टीस्पून पाणी घालावे. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावे. आता मसूर घालावेत. मसाल्यात व्यवस्थित मिसळून घ्यावी. मसूर धुतलेले पाणी, मीठ घालून उकळू द्यावे. आवश्यक ती सुसंगती आल्यावर गॅस बंद करावा. फोडणी करून त्यावर ओतावी. भाताबरोबर गरमागरम खायला द्यावी .

आपली प्रतिक्रिया द्या