हरिश्चंद्राचा दिग्दर्शक

48

>> मिलिंद शिंदे

परेश मोकाशी… स्वच्छ, स्पष्ट उच्चार तितकाच स्वच्छ दृष्टिकोन… आपल्या कामाबाबत!

स्वतःचं गुणगान करत नाही तो… ना त्यानं लिहिलेल्या कलाकृतींचं… तो त्या ‘त्या-त्या वेळेस घडल्या’ असं अगदी साधेपणानं कबूल करतो. अर्थात त्या बोलण्यात विनम्रतेची काहीतरी ‘पोज’ घेतोय असं आपल्याला तसूभरही वाटत नाही इतक्या सहजपणे तो व्यक्त होतो. प्रायोगिक रंगभूमीवर गाजलेलं व एक महत्त्वाचा टप्पा मानलं गेलेल्या ‘संगीत डेबूंच्या मुली’ या त्याच्या नाटकाबद्दल मी जेव्हा त्याला विचारलं तर तो म्हणाला…‘ते?’
‘‘थिएटर ऍकॅडमीमध्ये असताना काहीतरी लिहायचो… त्यातलं ते एक दिवस करावंसं वाटलं. केलं.’’
भला मोठा जगाचा नकाशा भिंतभर पसरलेला आणि सुसज्ज गंथालय… त्या भल्या मोठय़ा जगाच्या नकाशाकडे पाठ करून परेश बोलत होता. ही त्याची अभ्यासिका.
‘‘नट व्हायला आलो होतो… जसे आपण सगळे आपल्या सुरुवातीच्या काळात प्रयत्न करत होतो, थिएटर ऍकॅडमीमध्ये काम करताना अनेक मोठमोठय़ा लोकांची कामे पहाता आली.. त्यांना जवळून अनुभवता आले…त्यांची नाटकं अगदी सुरुवातीच्या प्रोसेसपासून ते त्याच्या प्रयोगापर्यंत उभी राहीपर्यंतचा सगळा प्रवास अगदी जवळून पाहता आला. माझं कलावंत म्हणून एक घडणंच होतं ते…’’ मोठी झेप घ्यायची असेल तर मुंबईकडे जाणं भाग होतं.
परेश खरं तर लोणावळय़ाचा. तिथं त्याचं प्राथमिक-माध्यमिक शिक्षण झालं, पण तो तिथून थेट मुंबईस न जाता पुण्याला आला. तिथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्याच्यावर रंगसंस्कार झाले आणि मुंबईकडे निघावे असं वाटू लागलं. पण मुंबईकडे सरकता सरकता ‘‘आपण फार बरे नट नाही आहोत.’’ हे तो प्रांजळपणे कबूल करतो अर्थात हा त्याचा विनय म्हणेन मी…
आणि मग आपसूकच त्याचा हात पुन्हा लिहिता झाला.. तो आगळा लेखक आहे… जुने संदर्भ वर्तमानाशी जोडून विनोदाच्या माध्यमातून एक सामाजिक भान अधोरेखीत करण्याचा (फारसं लोकांना शिकवण्याच्या फंदात न पडता, उपदेश न करता) त्याचा कटाक्ष असतो. त्यातूनच ‘‘मु.पो. बोंबीलवाडी’’ या त्याच्या अत्यंत गाजलेल्या, रसिकांनी आणि समीक्षकांनी गौरविलेल्या लोकप्रिय नाटकाचा जन्म झाला. दिवसात दोन-दोन, तीन-तीन प्रयोग या नाटकाचे होत असत, अर्थात ऊर्जावान कलावंतांचा संच परेशच्या पाठीशी आणि ‘अथर्व’चे संतोष काणेकर आणि अभिजीत साटम यांची भरभक्कम साथ जोडीला… इतकं गाजलं नाटक की ते नाटक आपल्या देशाच्या सीमेवर सैनिकांसाठी सादर करण्यात आलं… हे पहिल्यांदाच घडत असावं!
‘लग्नकल्लोळ’ (संगीत लग्नकल्लोळ खरं तर, पण मग त्यातला ‘संगीत’ हा शब्द नंतर वगळण्यात आला; पण नाटकातली गाणी अप्रतिम होती. आणि मानसी जोशी, आस्ताद काळे अप्रतिम गायचे) या त्याच्या आगळय़ावेगळय़ा शैलीत लिहिलेल्या नाटकाच्या निमित्ताने परेशची आणि माझी पहिली भेट झाली. नाटकाचं वाचन होतं, काही संभावित कलाकार व जाणकार रंगकर्मींसाठी वाचनाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाटक कसं वाचावं याचा वास्तुपाठच तो. कुठेही अडखळणं नाही. संयत विनोद, हलके शिडकावे.. आणि संयत केलेलं नाटय़वाचन. छोटा स्टूल (चौरंग) समोर ठेवून आपल्या अतिशय स्वच्छ वाणीत नाटय़वाचन करणारा परेश अजूनही तसाच आठवतोय, दिसतोय. आमच्या (संगीत) लग्नकल्लोळ या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली… आजचे आघाडीचे नट. ऋषीकेश जोशी, वैभव मांगले, आस्ताद काळे, मानसी जोशी, गीतांजली कुलकर्णी, आशिष बेंडे, सचिन देशपांडे आम्ही सगळे तेव्हा अगदी नवखे म्हणता येतील असे… परेशचा भाषाभ्यास अनोखा, नितळ. तो कलावंताच्या भाषेवर अपार मेहनत घेतो अगदी अर्धविरामपासून ते प्रश्नचिन्ह (संदीप पाठक याचा प्रश्नचिन्हाचा किस्सा नाटय़समूहातले लोक जाणतात… संदीप पाठक अतिशय उमदा नट) परेश प्रत्येक बाबतीत जागरूक…
परवा त्याच्या घरी गेलो तर त्याचे दोन डॉग दार उघडताच अंगावर आले (घाबरलो).
‘दोन ते तीन मिनिटं ‘स्थिरं’ उभं रहा. स्थिरं लेखनात हा उच्चार करून दाखवता येत नाही, पण उच्चारणातून पाहिलं तर स्थिर आणि स्थिरं.. असे आपण समजून घेऊया… असा परेश.
लग्नकल्लोळ त्याच्या संहितेच्या ऊर्जतपणाबद्दल आणि सादरीकरण व कलावंताच्या कामाबद्दल खूप गाजलं…परेश मोकाशी आणखी मोठं नाव झालं…
‘‘मला लेन्स कळत नाहीत.. मला फार सिनेमातलं तांत्रिक ज्ञान नाही.. त्यासाठी त्या-त्या क्षेत्रातली तज्ञ मंडळी माझ्यासोबत आहेत, तो त्यांचा कॉल आहे…’’
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’सारखा नावाजलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक अगदी प्रामाणिकपणे आपली भूमिका आपल्या समोर ठेवतो… ‘‘हो, सगळंच जर मला कळायला हवं तर मीच होईन ना कॅमेरामन मग…? सगळं मीच करतो… ही माणसं (तज्ञ मंडळी) आहेत ना…’’ हो पण समोर मॉनिटरवर त्या आयतामध्ये काय हवं नको ते मी सांगू शकतो. ते मला नक्की माहीत आहे… परेशच्या या त्याच्या निग्रहातून आकार घेतला त्याच्या पहिल्या सिनेकलाकृतीनं… हरिश्चंद्राची फॅक्टरी.. चित्रपट अतिशय गाजला… रसिकांनीही डोक्यावर घेतला आणि जाणकार समीक्षकांनीही.
सध्या काय? मी
जुन्या ग्रंथांचा आणि काही हस्तलिखितांचा आधार घेऊन ‘ऍप’सारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न (मानस) आहे…
परेशचं हे ऍपही त्याच्यासारखंच आरपार असणार.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या