आनंदी…स्वानंदी…

424

>> नम्रता पवार

अभिनेत्री स्मिता तांबे. तिच्या चौथ्या चित्रपटाची वर्णी इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लागली आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी गप्पा…

अभिनेत्री स्मिता तांबे… परिघाबाहेरचे चित्रपट आणि तिचा सर्वांगसुंदर अभिनय ही तिची खरी ओळख. तिचा अभिनय तिच्या सुंदर डोळय़ांतून व्यक्त होतो. अगदी सहजपणे ती तिच्या भावभावना डोळय़ांतून व्यक्त करते. स्मिताचा ‘गढूळ’ हा चित्रपट 50 व्या इफी महोत्सवात पोहोचला आहे. यापूर्वी तिच्या धूसर, रूख, पांगिरासारख्या चित्रपटांची वर्णी इफी महोत्सवात लागली होती.

इफी महोत्सव
हिंदुस्थानी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांशी तसा माझा जुना ऋणानुबंध आहे. इफी हा महोत्सव म्हणजे सिनेरसिकांची पंढरी आहे. या इफी महोत्सवामध्ये ‘गढूळ’ या चित्रपटाची निवड ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे.

दिग्दर्शकाची अभिनेत्री
होय, मी दिग्दर्शकाची अभिनेत्री  आहे. दिग्दर्शकाची वेस मला ओलांडून जायला आवडत नाही, परंतु त्याने मला अभिनय करताना ‘‘फक्त तू डावीकडेच बघ’’ असं सांगितलं तर मी अगदी तसंच करेन असेही नाही. मात्र त्याने मला डावीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळय़ा पद्धतीने सांगितला तर मात्र त्याने सांगितलेल्या अर्थापर्यंत पोहोचायला मला अधिक आवडेल. दिग्दर्शक हा त्या प्रोजेक्टचा प्रमुख असतो. त्यांच्यामुळे अभिनेते तयार होतात. म्हणूनच मी डिरेक्टर्स ऍक्टर असल्यामुळे माझं  काम अधिक वेगळं आणि छान होतं. रंगादादा म्हणजेच श्रीरंग गोडबोलेंसोबत सध्या मी ‘इडियटस्’ हे नाटक करतेय. तो जे सहज लिहितो त्यामध्येदेखील खूप काही सांगून जातो. एका वाक्यामध्ये तो संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जातो.‘72 मैल’चं सगळं क्रेडिट राजीव पाटीलचं आहे.‘‘तू या फिल्ममुळे 100 वर्षे काम करतील’’ हे त्याचं वाक्य तेव्हा उमगलं नव्हतं ते आज उमगतंय.

मी स्वानंदी…
अभिनय क्षेत्रात काम करीत असताना कालांतराने मला जाणवू लागलं की, मी 24 तास अभिनेत्री झालेय. मी कोण आहे? हा प्रश्न मला सतत पडू लागला. त्यानंतर मात्र मी मलाच सावरलं. त्यातून बाहेर पडले… अभिनय हा माझ्या आयुष्यातील छोटासा भाग आहे याची मला जेव्हा मनापासून अनुभूती झाली तेव्हा अभिनयाचा मी मनापासून आनंद घेऊ लागले. आता मात्र मला जे वाटतं तेच मी करते. आनंदी राहते, सकारात्मक विचार करते. तसंच उद्या काम हाती नसेल तर काय? ही असुरक्षितता मला जाणवतच नाही. कारण आज जे काम मी करतेय त्यावर मी खूप प्रेम करते. एखादी व्यक्ती मला आवडली आणि त्याचं प्रोजेक्ट फारसं चांगलं नसेल तर ती व्यक्ती मला आवडली म्हणूनदेखील मी काम करते. कारण त्यातून मला आनंद मिळतो. मी जेव्हा घरी असते तेव्हा छान गोधडय़ा शिवत असते. विविध तोरणं, बेडशीटस्, ड्रेस डिझाइन करीत असते. छान छान कलाकृती मला सुचतात. त्यामुळे माझं काम संपतं तेव्हा मी तिथून त्वरित बाहेर पडते.

वेब सीरिज
हे एक अतिशय वेगळं माध्यम आहे आणि याचा एक भाग आहे याचा मला मला खूप आनंद आहे. ‘सेक्रेड ग्रेम’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये काम करताना खूप मजा आली. खूप सुंदर अनुभूती होती. वेब सीरिजना खरोखरच खूप फ्युचर आहे. एकतर खूप कमी वेळेत काम होतं. वेगळय़ा कथानकांमुळे तोच तोचपणा जाऊन विविध विषयांवरच्या सीरिजचा आनंद घेता येतो.

लग्नानंतरचं रूटिन
नाटय़ कलाकार आणि आर्टिस्ट धीरेंद्र द्विवेदींशी माझं लग्न झालंय. ते एक उत्तम कलाकार  आहेत. लग्नानंतर आमच्या दोघांच्याही रूटिनमध्ये फारसा काही बदल झालेला नाही. कारण आम्ही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं आहोत. एकमेकांच्या भावनांचा, निर्णयांचा आदर करतो. धीरेंद्रजींमुळे माझं उशिरापर्यंत सिनेमे पाहणं बंद झालंय. कारण त्यांच्यामुळे लवकर निजून पहाटे लवकर उठायला शिकलेय. नुकतंच आम्ही स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलंय. त्याद्वारे विविध उपक्रम सुरू करणार आहोत.

डोळय़ांतून भावना व्यक्त करते
अभिनेते प्रमोद पवार यांनी सुरुवातीला जेव्हा मला सांगितलं की, स्मिता तुझे डोळे खूप सुंदर आणि बोलके आहेत, त्यांचा वापर करायला शिक. तेव्हा मला काहीच समजलं नव्हतं. मात्र हळूहळू इतर अभिनेत्रींची कामे पाहू लागले तेव्हा समजलं की, डोळे हा अभिनयाचा सर्वोत्तम भाग आहे. मला नेहमीच वाटतं की, जेव्हा तुमचे मन तुम्हाला खरं सांगेल, संवाद साधेल तेव्हाच तुमचा अभिनय डोळय़ांमधून अधिक जिवंत होईल. इमोशनल स्टोरी कम्युनिकेट करायला डोळे हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि मी ते अधिक प्रभावीपणे व्यक्त करते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या