परिकथांच्या गुलाबी जगात…

>> रोहिणी निनावे

सुरज बडजात्या… हिंदी चित्रपटसृष्टीत खुप सज्जन, सोज्वळ माणसं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. बडजात्या कुटुंबाने हा सज्जनपणा चांगुलपणा केंद्रस्थानी ठेवूनच नेहमी रसिकांचे मनोरंजन केले आहे.

आजच्या जगातही चांगुलपणा, माणुसकी, संस्कार अजून टिकून आहे, असं ज्या मूठभर लोकांकडे बघून वाटतं, त्यांच्यापैकी एक म्हणजे सूरज बडजात्या. मी त्यांना प्रथम भेटले तेव्हा एका वाईट मनोवस्थेमधून जात होते, सीरिअलच्या कामानिमित्त त्यांची माझी भेट झाली आणि माणुसकी, चांगुलपणा याच्यावर माझा पुन्हा विश्वास बसला. हे सांगण्याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही एक चांगली संवेदनशील व्यक्ती असता तेव्हाच तुम्ही एक चांगली कलाकृती करू शकता. राजश्री प्रोडक्शनचं नाव फिल्म जगतात जुनं आहे आणि आदराने घेतलं जातं.

या चित्रसंस्थेशी आणि बडजात्या परिवारासोबत काम करण्याची मला संधी मिळाली, जवळजवळ दोन वर्षांनी मी राजश्री प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये जात होते. पाच वर्षे सतत मी राजश्री प्रोडक्शन बरोबर काम केलं होतं. आठवडय़ातून एक मीटिंग तरी असायचीच. मी सगळ्यात आधी पोहोचले असायचे, तेव्हा सूरजजींचे वडील राजबाबू म्हणायचे.. तुमचं कौतुक वाटतं, तुम्ही कधीच उशिरा येत नाही. आज ही मी बिफोर टाइम पोहोचले होते, पण आज राजबाबू हे बोलायला तिथे नव्हते. सगळ्या आठवणी त्या वस्तूमध्ये गेल्यावर जाग्या झाल्या.

सूरजजींना मी मुलाखतीविषयी विचारलं, तेव्हा अत्यंत साधेपणाने.. क्यों नहीं रोहिणी जी … जरूर मिलेंगे .. असं ते म्हणाले. ‘मैने प्यार किया’ या त्यांच्या अवघ्या 24 व्या वर्षी दिगदर्शित केलेल्या चित्रपटाने तेव्हा अख्या तरुण पिढीला वेडावून टाकलं होतं. आम्ही बोलायला सुरुवात केली … मी म्हटलं सर , तुमच्या घरात चित्रपटनिर्मितीला पूरक असं वातावरण होतंच, पण आपण या क्षेत्रात काम करावं असं कधी वाटलं तुम्हाला? सूरजजी म्हणाले, आमच्याकडे लेखक, दिग्दर्शक यायचे. स्टोरी सेशन चालायचं. ते मी ऐकायचो. घरामध्ये, ऑफिसमध्ये फिल्मच्या रीळ असायच्या, त्यांचा वास मला खूप आवडायचा! आमच्या घराण्याचं फिल्मी वर्तुळात चांगलं नाव असलं, तरी वडिलांनी किंवा आजोबांनी कधी चित्रपटाचं दिग्दर्शन वगैरे केलं नव्हतं.

पण मी बघत होतो, कैक डिरेक्टर माझ्या वडिलांच्या साधेपणाचा फायदा घ्यायचे, चित्रपटापेक्षा इतर गोष्टींमध्येच त्यांचं लक्ष होतं, तेव्हा वाटलं त्यापेक्षा आपणच फिल्म डिरेक्ट केली तर. मी जेव्हा असं काही बोलून दाखवलं तेव्हा आईने विरोध केला म्हणाली, बिझनेस वगैरे ठीक आहे, पण क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये पडू नकोस. उद्या पिक्चर चालला नाही तर तुझं अपयश मला बघवणार नाही . एक आई म्हणून तिला वाटणारी ती काळजी होती.

तरी माझ्या मनात खुमखुमी होती ..मग मी सारांश चित्रपटासाठी महेश भट यांना असिस्ट करायला लागलो. तिथलं वातावरण बघून अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी यांचं काम बघून पहिल्याच दिवशी मी मनाशी निर्णय घेतला की. आपण एक चांगली फिल्म दिगदर्शित करायची, पण त्यासाठी आवश्यक तो अनुभव घेणं गरजेचं होतं. याच दरम्यान एका लेखकाकडून मी एका फिल्मचं स्क्रिप्ट लिहून घेतलं. पण जेव्हा त्याने ते स्क्रिप्ट मला आणि वडिलांना ऐकवलं तेव्हा लक्षात आलं की, मला जे म्हणायचं होतं, मला जे अपेक्षित आहे ते यात उतरलंच नाहीय. मग मी ठरवलं आपणच स्क्रिप्ट लिहायचं. खूप मेहनत करून मी एक स्क्रिप्ट लिहिलं आणि वडिलांना ऐकवलं.

वडील म्हणाले, चांगलं लिहिलंयस, पण आजच्या काळात आणि तुझ्या या वयात या विषयावर सिनेमा करण्यापेक्षा तू एखादी लव्ह स्टोरी कर. मला त्यांचं म्हणणं पटलं. मग त्यांनी मला एक छोटंसं कथाबीज दिलं. त्यावर मी स्क्रिप्ट लिहिलं. सलमानला नायक करण्याचं ठरलं, पण नायिकेची निवड करण्यात खूप महिने गेले. अखेर भाग्यश्री पटवर्धनच्या रूपाने नायिका मिळाली. दोन गोष्टींमुळे माझा विश्वास वाढला एक म्हणजे चित्रपटाची गाणी गाण्यास लताजींनी होकार दिला, दुसरं म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आमच्या चित्रपटात काम करण्यास होकार दिला.

मला हे ऐकून गम्मत वाटली. मी विचारलं का? सूरजजी म्हणाले, तेव्हा लक्ष्मीकांतजींचं खूप नाव होतं. माझा त्यांच्यावर खूप विश्वास होता. पण रोहिणीजी तेव्हा व्हीसीआरचा जमाना होता. लोक मुद्दाम उठून थिएटरमध्ये जात नव्हते. त्यांना थिएटरमध्ये खेचून आणण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. आम्ही सगळ्यांनी जे मिळून जे काही केलं ते लोकांना खूप आवडलं होतं. फिल्म हिट झाली.

आधी माझ्यावर नाराज असलेली माझी आई चित्रपट बघून खूश झाली. पण पहिला चित्रपट हिट झाल्यावर दुसरा चित्रपटही तितकाच चांगला बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. कथा शोधण्यातच खूप वेळ गेला. वडील म्हणाले, ‘नदिया के पार’चा रिमेक बनवू या. म्हटलं या काळात कसा बनवायचा रिमेक. मी ‘नदिया के पार’ची पारायणं केली. खूप विचार करून स्क्रिप्ट लिहिलं.

टीम तीच हवी होती. माधुरी खूप बिझी होती त्यामुळे तिच्या डेटस् फ्री होण्याची वाट बघावी लागली, या चित्रपटाचं चित्रीकरण का एक आनंददायी अनुभव होता. फिल्म तयार झाली. लिबर्टीमध्ये त्याचा प्रीमिअर होता. इंडस्ट्रीमधले मोठे लोक आले होते. पडद्यावर सूरज बडजात्या हे नाव आल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. मी खूश झालो. आपण यशस्वी झालो असं वाटलं, पण इंडस्टीमध्ये कुणाला तो चित्रपट फारसा आवडला नाही. मध्यंतरात तर एक जण म्हणाला .. दिल छोटा मत करो.. होता है डिरेक्टर्स के साथ ये, कभी कोई फिल्म नही जमती. मला वाईट वाटलं. एवढंच काय ..पेपरमध्ये ही रिव्यू चांगला आला नव्हता. छायागीत अशी संभावना चित्रपटाची केल्या गेली होती. पहिले दोन आठवडे चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स नव्हता. मात्र नंतर माऊथ पब्लिसिटीने काम केलं आणि चित्रपट सुपरहिट झाला. लोक लग्नाला जावं तसे तयार होऊन चित्रपट बघायला येत. मी निःश्वास सोडला. त्यावेळी ड्रेस डिझायनर ही संकल्पना फारशी रूढ झाली नव्हती. या चित्रपटापासून ती रूढ व्हाल लागली. माझी आई मला कायम एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व सांगायची. मी या विषयावर काही करावं असं तिला वाटायचं. आणि त्यातूनच जन्म झाला ‘हम साथ साथ हैं’च्या कथेचा.

हिंदी चित्रपटात तेव्हा स्थित्यंतर आलं होतं. चित्रपटाचं चित्रीकरण परदेशी व्हायला लागलं होतं .. संगीत, चित्रीकरणाची पद्धत बदलली होती. आता जर लव्ह स्टोरी बनवायची असेल तर काळाप्रमाणे चालावं लागेल म्हणून मग मी ‘मैं प्रेम की दिवानी हूँ’ हा चित्रपट केला. हृतिक रोशन, अभिषेक बच्चन, करिना कपूरसारखी कास्ट होती. पण तेव्हा मला खात्री नव्हती हा नवीन पद्धतीचा जॉनर मला जमेल का? अशाच काहीशा मनःस्थितीत मी फिल्म केली.
जेव्हा एखादा चित्रपट चालत नाही तेव्हा त्याचं त्या चित्रपटाशी निगडीत सगळ्यांनाच खूप दुःख होतं. विशेषतः लेखक, दिगदर्शकाला!
वडिलांसमोर जाऊन मी म्हटलं, चुकलं माझं. तेव्हा ते म्हणाले, म्हणूनच मी नेहमी सांगतो, आपल्याला जे आवडतं, जे जमतं ते आपण करावं. धीर सोडू नकोस. आता लगेचच एक फिल्म बनव. फार शो शा नसलेली, साधी गोष्ट, तुझा गेलेला कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी!

क्रमशः