स्वागत दिवाळी अंकांचे

उद्याचा मराठवाडा शिक्षणपर्व : 2018

हा संपूर्ण अंक शिक्षणाला वाहिलेला आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, बाळासाहेब थोरात, मानवेंद्र काचोळे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुलाखती या अंकात आहेत. श्रीकर परदेशी यांच्या कॉपीमुक्त अभियानाचा आढावा घेणारा पद्माकर कुलकर्णी यांचा लेख माहितीपूर्ण आहे. डिजिटल क्रांतीचे यशस्वी प्रयोग करणारे रणजितसिंह डिसले, शिक्षणतज्ञ रेणू दांडेकर, समीक्षा गोडसे, प्रसाद मणेरीकर, विद्याधर शुक्ल, उल्का महाजन यांनी त्यांच्या क्रांतीविषयी माहिती देणारे लेख वाचनीय. चार्वाक प्रतिमा हेरंब या अकरावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने केलेली अप्रतिम रेखाटनं ही कविता विभागाची खासियत आहे.

संपादक : राम शेवडीकर

मूल्य : 200 रु., पृष्ठे : 256

छोट्यांचा आवाज

या अंकात मुलांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे मान्यवरांचे लेख, कथा, कविता यांची रेलचल आहे. मामाचं वेडं कोकरू (गिरिजा कीर), शीतलचा धक्का (भा.ल. महाबळ), चतुरसेन (प्रभाकर झळके), बडबडे सातभाई (माधव गवाणकर), वाघा बॉर्डर (अशोक लोटणकर), जादूची दोरी (विनायके अत्रे), हनुमान आला वाढदिवसाला (शुभदा सुरंगे), आजोबांच्या माहेरी जाऊया (चंद्रकांत महामिने), फोंडय़ाचा किल्ला (अनिलकुमार अष्टेकर) आदी मान्यवरांच्या कथा/लेख मस्त आहेत. याशिवाय डॉ. विजया वाड, डॉ. श्रीकांत नरूले, किरण भावसार, भालचंद्र गन्द्रs, अशोक लोटणकर आदी मान्यवरांच्या खुसखुशीत कविता लहानांना आवडीतील अशाच आहेत.

संपादिका : वैशाली विवेक मेहेत्रे

मूल्य : 100 रु., पृष्ठे : 140

महानगरी वार्ताहर

यंदाचा हा अंक ‘सिद्धमंत्र’ विशेषांक म्हणून प्रकाशित झाला आहे. त्यात मंत्र साधनेबद्दल विविध लेख असून काही निवडक मंत्रांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. सामूहिक पठणामुळे निर्माण होणारी कंपने जीवन समृद्ध करतात, त्याची ओळख करून देणारा लेख या अंकात आहे. याशिवाय प. प. टेंब्येस्वामी यांनी रचलेले अघोरकष्टोद्धरण स्तोत्र व करुणा त्रिपदी यांच्या निर्मितीची माहिती देणारा लेख, श्री विष्णूसहस्त्र्ानाम, गायत्री मंत्र उपासना, श्री स्वामी समर्थ मंत्रशक्तीचे महत्त्व सांगणार्‍या लेखांचा समावेश या अंकात आहे. यासोबतच प्रज्ञावर्धन स्तोत्र, श्री गणपती अथर्वशीर्ष, मंत्रशक्तीची वैद्यकीय संकल्पना, श्री अन्नपूर्णा स्तोत्र, रामचरित मानसमधील दिव्य मंत्र, मंत्रसाधना आणि ज्योतिष आदी विविध लेख या अंकात आहेत.

संपादक : सतीश सिन्नरकर

मूल्य : 200 रु., पृष्ठे : 196

रणांगण

आवडत्या क्षेत्रातील गुरूला/मार्गदर्शकाला लिहिलेलं जाहीर आंतरिक पत्र, अनेक वर्षे मनात रेंगाळलेला, सांगायचे राहून गेलेला असा महत्त्वाचा पत्रसंवाद हा या अंकाचा विषय आहे. या पत्राने काही अज्ञात गोष्टींवर प्रकाश पडेल व हा संवाद वाचणारे एका वेगळ्या अनुभवाचे धनी होतील. जगण्याची एक अनोखी सुंदर निरामय वाट दाखवणारी ही पत्रे लिहिलीत नीरजा, अशोक नायगावकर, नितीन तेंडुलकर, संतोष पाठारे, रामदास खरे, कै. माधव गडकरी, किरण येले, अशोक लोटणकर, आश्लेषा महाजन आदी मान्यवरांनी. याशिवाय नव्या दमाच्या कवींच्या कविता या अंकात समाविष्ट आहेत. आदिनाथ हरवंदे, सदानंद दळवी, अरविंद बुधकर यांच्या कथा वाचनीय आहेत.

संपादक : डॉ. अविनाश गारगोटे

मूल्य : 150 रु., पृष्ठे : 181

आपली प्रतिक्रिया द्या