डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वंकश चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमुल्यांकन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले आहे की, एका परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले ? निगेटीव्ह मार्किंग सिस्टीममुळे एक उत्तर चुकले तर 5 मार्क कमी होतात. पण काहींना 716, 718 गुण मिळाल्याचेही दिसत आहे, यामुळे हा प्रकार संशयास्पद वाटतो. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी ही परिक्षा अत्यंत महत्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून ही परिक्षा दिली त्यांच्यावर हा अन्याय आहे, असे पटोले म्हणाले.
या गैरकारभारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विद्यार्थ्यांचे आयुष्यही अंधकारमय करून टाकले आहे. घोटाळे, गैरकारभार, पेपरफुटी असे प्रकार सर्रास होत आहेत. काँग्रेस पक्षाने सत्तेत आलो तर पेपरफुटीवरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. भाजप सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये व असे गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.