
मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणाने आपल्याच बालपणीच्या मित्रासह अन्य 10 जणांना तब्बल 49 लाख 54 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 5 ते 7 टक्के आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी सागर साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार अभिजित जाधव आणि आरोपी सागर साळुंखे हे दोघेही बालपणीचे मित्र असून दोघेही खारघरमध्ये राहतात. कोविड काळानंतर सागरने पुण्यात जाऊन शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर खारघरमध्ये परत येऊन एक कंपनी स्थापन केली. सागरने आपल्या मित्रांना त्याचे शेअर मार्केटमधील प्रोफाईल आणि मिळत असलेला नफा दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच शेअर मार्केटमधील पैसे गुंतवल्यास दरमहा 5 ते 7 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. सागर हा बालपणीच्या मित्र असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून अभिजित जाधव याने टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नियमित परतावा मिळाला. मात्र त्यानंतर परतावा येणे बंद झाल्याने अभिजितने पैशांची विचारणा केली असता सागरने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी आरोपी सागर साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



























































