दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींचे नुकसान, इराण-इस्रायल युद्धामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले; दलाल स्ट्रीटवर लाल त्सुनामी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे हिंदुस्थानच्या शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही गडगडले आहेत. मागील दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी रुपयांचे  नुकसान झाले.

इराणमधील वाढत्या संकटामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली, ज्याचे पडसाद देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आले. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसईचा निफ्टी सलगच्या दोन सत्रांत 2.5 अंकांनी खाली आला. तज्ञांच्या मते, इराण- इस्त्रायल- अमेरिका युद्धामुळे शेअर मार्पेटमध्ये शॉर्ट टर्म चढउतार दिसून येईल. मात्र हिंदुस्थानी मार्पेटचा लाँग टर्म आऊटलूक मजबूत आहे.

मुंबई शेअर बाजाराला अमेरिका-इस्रायल आणि इराणच्या संघर्षाचा धक्का बसताना दिसतोय. गेल्या आठवडय़ात शुक्रवारी सेन्सेक्स 81,287 वर क्लोज झालेला, तर सोमवारी ओपनिंगच्या काही मिनिटांत बीएसई सेन्सेक्स प्री-ओपनमध्ये चांगलाच घसरला. सोमवारी बीएसई निर्देशांक एक हजार अंकांनी घसरून 81 हजारांवर बंद झाला, तर निफ्टी खाली येऊन 25 हजारांवर बंद झाला. त्यामुळे सोमवारी एका दिवसात गुंतवणूकदारांचे 6.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सच्या सहसंचालिका तन्वी पंचन यांच्या मते, मार्केटमधील जलद करेक्शन जास्त काळ परिणाम करू शकत नाही. अशी स्थिती मार्केटमध्ये याआधीही झाली होती. हिंदुस्थानची देशांतर्गत आर्थिक स्थिती चांगली आहे. जानेवारी 2026 मध्ये नेट जीएसटी कलेक्शन 1,71 लाख कोटी रुपये झाले आहे. आर्थिक वर्ष 2027 मध्ये महसुलात वाढ होईल. तज्ञांच्या मते, शेअर मार्पेटमधील पडझडीने घाबरून जाऊ नका. ही आर्थिक शिस्तीची वेळ आहे.