
आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन देण्यास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)आज विरोध केला. चिदंबरम यांच्यावरील आरोपांची तीव्रता अधिक असल्याने त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद दिल्ली उच्च न्यायालयात करीत ईडीने त्यांच्या जामिनास विरोध केला.
ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात 74 वर्षीय चिदंबरम यांच्या जामिनास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दिल्ली उच्च न्यायालयात सादर केले. याप्रकरणी आता दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेश कैत यांच्या न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने 22 ऑक्टोबर रोजी आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामीन मंजूर केला होता. सध्या ते ईडीने दाखल केलेल्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्यांना तिहार तुरुंगात ठेवले आहे. चिदंबरम त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांना कोणताही दिलासा देण्यासाठी ते पात्र नाहीत, असे ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

























































