रेशनवर मिळणार आयोडीनयुक्त मीठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरातील रेशन कार्डधारकांना लवकरच स्वस्त धान्य दुकानातून लोह व आयोडीनयुक्त मीठ मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागामार्फत टाटा ट्रस्टच्या सहयोगातून हा उपक्रम राबवण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नगर शहरातील 91 स्वस्त धान्य दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर मीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी 127 क्विंटल मिठाची मागणीही सरकारकडे करण्यात आली आहे. त्यानंतर मीठ खरेदीला मिळणारा प्रतिसाद पाहून जिल्ह्यातील इतर स्वस्त धान्य दुकानांसाठी मिठाची मागणी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 14 रुपये किलो दराने सर्व रेशन कार्डधारकांना हे मीठ वितरित करण्यात येईल.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्य सरकारच्यावतीने टाटा ट्रस्टच्या सहयोगातून रेशन कार्डधारकांना प्रतीकार्ड एक किलो याप्रमाणे लोह व आयोडीनयुक्त मीठ वाटप करण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे या विभागांतर्गत असणार्‍या काही स्वस्त धान्य दुकानांतील रेशन कार्डधारकांना या उपक्रमाचा सध्या लाभ मिळत आहे. याच अनुषंगाने नगरमधील रेशन कार्डधारकांना या उपक्रमाचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तयारी सुरू केली असून, नगर शहरातील स्वस्त धान्य दुकानांतून लोह व आयोडीनयुक्त मीठ वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षापासून पहिल्या टप्प्यात नगर शहरातील 91 स्वस्त धान्य दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या शहरात अंत्योदय रेशन कार्डधारक एक हजार 184, तर प्राधान्य कुटुंब रेशन कार्डधारकांची संख्या चोवीस हजार 219 एवढी आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब रेशन कार्डधारकांशिवाय शुभ्र व केसरी रेशन कार्डधारकांनासुद्धा या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळेच जिल्हा पुरवठा विभागाने पहिल्या टप्प्यात एकूण 127 क्विंटल मिठाची मागणी केली आहे. हे मीठ प्राप्त होताच त्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. नगर शहरातील स्वस्त धान्य दुकानांवर आयोडीनयुक्त मीठ घेण्यास चांगला प्रतिसाद मिळाल्यास जिल्ह्यातील इतर स्वस्त धान्य दुकानांवर मीठ उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी नव्याने मागणी करण्यात येणार आहे.