हिंदुस्थानात आयपीएलचं तुफान, पर्यटनाला चालना

113

सामना ऑनलाईन । मुंबई

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या आवृत्तीचा शानदार प्रारंभ झाला आहे. आयपीएलमुळे क्रिकेटवेड्या या देशात पर्यटनाला देखील चालना मिळाली आहे. वीकेंडला आपल्या आवडत्या संघाला खेळताना पाहाण्यासाठी प्रवास करण्याचीही तयारी असलेल्यांकडून पर्यटनस्थळी चांगला प्रतिसाद मिळत आहे. हॉटेल्स, मॉल्समध्ये मिळणाऱ्या सवलती आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या उड्या पडत आहेत. मोठी गर्दी आणि प्रतिसाद पाहता सेवा पुरवठादारांनी देखील सामना आणि सुट्टीचे समीकरण साधून सवलती दिल्या आहेत.

आयपीएलचा सामना आणि स्थानिक स्थळदर्शन असे एकत्रित आरक्षण करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 30 टक्के वाढ झाली आहे. एकट्याने प्रवास करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निरीक्षण कंपनीने नोंदले असून त्यांच्याकडून होणाऱ्या हॉटेल आणि स्थळदर्शनाच्या आरक्षणात 20 टक्के वाढ दिसून आली आहे. मागणीतील वाढ लक्षात घेत ‘कॉक्स अँड किंग्ज’ने आयपीएल तारखांदरम्यान ग्राहकांच्या गरजांनुसार पर्यटनाचे खास कार्यक्रम आखले आहेत.

क्रिकेटच्या टी-20 वातावरणाचा लाभ घेण्यासाठी नवी मुंबईतील सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलने खरेदी करताना क्रिकेटचा आनंद घेता यावा यासाठी अभिनव योजना सुरू केली आहे. मॉलमध्ये 5 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान ‘तिकिट टु हॅपीनेस’ अशी योजना राबवली जाणार आहे. याअंतर्गत ग्राहकाने प्रत्येकवेळेस खरेदी केल्यानंतर त्याला रन मिळते. उदा. त्याने 2500- 5000 रुपयांदरम्यान खरेदी केल्यास त्याला 1 रन मिळते. त्याचप्रमाणे 10001- 25000 रुपयांदरम्यान खरेदी केल्यास चार रन्स मिळतात. क्रिकेटमधली इतर सर्व वैशिष्ट्ये उदा. फ्री हिट आणि एक्स्ट्राजही यात लागू होतात. स्कोअरनुसार ग्राहकांना ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सीरीज’ बक्षिस दिले जाईल. त्याशिवाय मॉलद्वारे साप्ताहिक आयपीएल तिकिटे आणि इंग्लंडमधील विश्वचषकाची कपल तिकिटेही बक्षिस म्हणून दिली जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या