IPL 2020 कोलकात्यासाठी हारना मना है, चेन्नईच्या युवा खेळाडूंना चमकण्याची संधी

आयपीएलच्या गुणतालिकेत 12 गुणांसह पाचव्या स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी उर्वरित दोन्ही लढतींत जिंकावेच लागेल. मात्र प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईचे त्यांच्यापुढे कडवे आव्हान असेल. स्पर्धेतून बाद झाल्याने चेन्नईवर कुठलेच दडपण नसेल. त्यामुळे या संघातील युवा खेळाडूंना चमकदार कामगिरी करून स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल.

… तर जरतरचे समीकरण
कोलकाता नाईट रायडर्सला आजच्या लढतीत पराभव पत्करावा लागला तर त्यांना जरतरच्या समीकरणावर अवलंबून राहावे लागणार. याप्रसंगी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पुढील दोन्ही लढती जिंकून स्वतःच्या मेहनतीच्या जोरावरच प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करील यात शंका नाही. पुढील दोन्ही लढती त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत.

काँटे की टक्कर
कोलकात्याकडे शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, कर्णधार मॉर्गन, सुनील नरीन असा खोलवर फलंदाजीक्रम आहे. चेन्नईकडे प्रतिस्पर्धी फलंदाजांमध्ये धडकी भरवणारा गोलंदाज नसला तरी दीपक चहर, सॅम पुरण, इम्रान ताहीर असे प्रतिभावान गोलंदाज आहेत. चेन्नईचा नव्या दमाचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करून आपली क्षमता दाखवून दिलेली आहे. त्यामुळे चेन्नईला त्याच्याकडून पुन्हा एका धमाक्याची अपेक्षा असेल. उर्वरित दोन लढतींत ऋतुराज चमकला तर त्याला आयपीएलमध्ये उज्ज्वल भविष्य असेल. शिवाय चेन्नईकडे फाफ डू प्लेसिस, अंबाती रायुडू, कर्णधार धोनी, रवींद्र जाडेजा, सॅम पुरण असे एकाचढ एक फलंदाज आहेत. त्यामुळे कोलकात्याच्या गोलंदाजीचाही आज खऱया अर्थाने कस लागणार आहे.

आव्हान राखण्याचे दडपण
पहिल्या साखळी लढतीत कोलकात्याने चेन्नईला हरवले होते. परतीच्या लढतीत त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी धोनीच्या सेनेकडे असेल. त्यावेळी दिनेश कार्तिक हा कोलकात्याचा कर्णधार होता, पण आता या संघाची धुरा इयॉन मॉर्गनकडे सोपविण्यात आली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा चेन्नई हा पहिला संघ ठरला, तर इतर सर्व संघांचे आव्हान अद्यापि जिवंत आहे.

त्यामुळे आजच्या लढतीतही स्पर्धेतील आव्हान राखण्याचे दडपण कोलकाता संघावर असेल. चेन्नईकडे आता गमावण्यासारखे काहीच नसल्याने त्यांच्या खेळाडूंना नैसर्गिक खेळ करता येणार आहे. शिवाय त्यांनी मागील सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेसर्ज बंगळुरूला पराभवाचा धक्का दिलेला आहे. त्यामुळेच कोलकात्यासाठी आजची लढाई सोपी नसेल.

आजची लढत

कोलकाता नाईट रायडर्स–चेन्नई सुपरकिंग्ज
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या