IPL 2020 – राहुलला ऑरेंज, तर रबाडाला पर्पल कॅप, आयपीएलच्या 13व्या हंगामातील पराक्रम

क्रिकेट विश्वात लोकप्रिय असलेल्या ‘आयपीएल’मध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रत्येक खेळाडू काैशल्य पणाला लावत असतो. कारण या स्पर्धेतील कामगिरीची सर्वच देशांच्या संघनिवड समितीला दखल घ्यावी लागते. यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक 670 धावा करीत ऑरेंज कॅप मिळविली, तर सर्वाधिक 30 बळी टिपणारा दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज पॅगिसो रबाडा पर्पल कॅपचा मानकरी ठरला.

स्पर्धेत 20 निर्धाव षटके

यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 14 गोलंदाजांनी 20 निर्धाव षटके टाकली. यात मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 षटके निर्धाव टाकली. त्यानंतर त्याचाच संघसहकारी जसप्रीत बुमराहने 2 षटके निर्धाव टाकली.

धवनची धमाल, किशनची कमाल

दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर शिखर धवनने यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दोन शतके ठोकण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा ‘आयपीएल’मधील तो पहिला फलंदाज ठरला. मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने सर्वाधिक 29 षटकार ठोकून क्रिकेटप्रेमींचे चांगलेच मनोरंजन केले.

पडिक्कल इमर्जिंग प्लेयर

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलच्या 13 व्या सत्रातील ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ म्हणून निवड झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा देवदत्त पडिक्कल इमर्जिंग ‘प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. मुंबई इंडियन्सने पाचव्या जेतेपदाबरोबरच ‘प्लेयर-प्ले’ अॅवॉर्डही जिंकला.

टॉप-5 मध्ये 4 वेगवान गोलंदाज

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया टॉप-5 गोलंदाजांमध्ये 4 वेगवान गोलंदाज आहेत. कॅगिसो रबाडा (30), जसप्रीत बुमराह (27), ट्रेंट बोल्ट (25) व अॅनरीक नॉर्खिया (22) या वेगवान चौकडीने स्पर्धेत 104 फलंदाजांना बाद केले. टॉप-5 गोलंदाजांमध्ये एकमेव फिरकीपटू असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या युजवेंद्र चहलने 21 बळी टिपले.

150 हून अधिक डॉट बॉल

यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने केला. टॉप-5 गोलंदाजांनी 150 हून अधिक डॉट बॉल टाकले आहेत. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 175, तर दिल्लीकडून अॅनरीक नॉर्खियाने 160 डॉट बॉल टाकले.

राहुलची सर्वाधिक अर्धशतके

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने केला. त्याने 5 अर्धशतके झळकावली. शिखर धवनने सर्वाधिक दोन शतके ठोकली, तर राहुलसह मयांक अग्रवाल व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले. राहुलने यंदाच्या सत्रात एका डावात सर्वाधिक 132 (नाबाद) धावांची खेळी केली.

षटकारांमध्ये मुंबईच भारी

यूएईमध्ये पार पडलेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी सर्वाधिक 137 षटकार लगावले. दुसऱया स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी 96 चेंडू मैदानाबाहेर भिरकावले. मुंबईकडून इशान किशन (30) व हार्दिक पंडय़ा (25) टॉप-5 फलंदाजांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या