आयपीएल समितीची बैठक आज, वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होणार

330

आयपीएल गव्हर्निंग समितीची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत आयपीएलच्या अंतिम वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करून त्यावर अंतिम निर्णयही या बैठकीत घेण्यात येणार आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांना मिळणारी ट्रेनिंग सुविधा, त्यांची राहण्याची व्यवस्था, प्रवासाची सोय, ब्रॉडकास्टर, प्रेंचायझी यांचा प्रॉब्लेम, वेळापत्रकाशी निगडीत अडचण या सर्व बाबींवर चर्चा करून या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल.

कुटुंबाला परवानगी मिळणार का?
हिंदुस्थानी क्रिकेटपटू जवळपास दोन महिने आयपीएल खेळणार आहेत. या काळात त्यांना हॉटेल व स्टेडियम या दोन गोष्टींव्यतिरिक्त इतर कुठेही फिरता येणार नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाशिवाय राहणे मुश्किलच असणार आहे. पण खेळाडूंच्या कुटुंबियांना सोबत राहण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांना हॉटेलच्या एका रूममध्येच रहावे लागणार आहे. काही खेळाडूंची मुले तीन ते पाच वर्षांची आहेत. ही लहान मुले सलग दोन महिने एका रूममध्ये राहू शकतील का, हाही प्रश्न यावेळी निर्माण होतो. त्यामुळे या मुद्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येईल यात वाद नाही.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे खेळाडू काही लढतींना मुकणार
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यामधील झटपट मालिका 16 सप्टेंबरला संपणार आहे. आयपीएलचा श्रीगणेशा 19 सप्टेंबरपासून होईल. त्यामुळे युएई सरकारच्या नियमानुसार ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांतील खेळाडूंना काही दिवस विलीगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील सुरूवातीच्या लढतींना या देशांतील खेळाडूंना मुकावे लागणार आहे. राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये या देशांतील बहुतांशी खेळाडूंचा समावेश आहे.

आफ्रिकन खेळाडूंसाठी चार्टर्ड प्लेन
दक्षिण आफ्रिकेत अद्याप विमानसेवांवर निर्बंध आहेत. त्यामुळे या देशांतील एबी डिव्हिलीयर्स, फाफ डय़ुप्लेसिस, क्विण्टॉन डी कॉक या महत्त्वाच्या खेळाडूंसह इतर खेळाडूंना चार्टर्ट प्लेनसह युएईत आणण्याचा विचार याप्रसंगी करण्यात येत आहे. या मुद्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

परवानगी मिळाल्यास 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एण्ट्री
आयपीएल स्पर्धा ही प्रेक्षकांविना खेळवण्यात येईल यासाठी सुरूवातीला प्रयत्न करण्यात येत होते. पण आता थोडी परिस्थिती बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. युएईत कोरोनाग्रस्तांची संख्या थोडी कमी आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था व आरोग्याची काळजी घेऊन किमान 30 ते 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी मिळू शकते. यासाठी युएई सरकारकडून परवानगीही घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या