IPL 2020 – सुपर से भी उपर! सुपर ओव्हरचा ‘डबल’ धमाका!! पंजाबने मारली बाजी, मुंबईचा पराभव

रविवारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत सलग दुसरा सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने फक्त 5 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. यानंतर मुंबईने देखील फक्त 5 धावा केल्याने सुपर ओव्हर देखील टाय झाली. यानंतर पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात आली आणि यात मुंबईने 11 धावा काढत पंजाबपुढे 12 धावांचे आव्हान ठेवले. पंजाबला 5 चेंडूत 15 धावा फटकावत बाजी मारली. या विजयासह पंजाबचे आयपीएलमधील आव्हान कायम राहिले असून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहेत.

दुबईच्या मैदानावर प्रथम बॅटिंग करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. किरोन पोलार्डने 12 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावांची वादळी खेळी केली. त्याला कुलटर-नाईलने 12 चेंडूत नाबाद 24 धावा काढत चांगली साथ दिली.

मुंबईची सुरुवात आज खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 9, सूर्यकुमार यादव शून्य आणि ईशान किशन 7 धावा काढून बाद झाले. 3 खेळाडू 38 धावात गमावल्यावर कृणाल पांड्या आणि क्विंटन डीकॉक यांच्यात 50 धावांची भागीदारी झाली. पांड्या 34 तर डीकॉक 53 धावा काढून बाद झाले. यानंतर आलेल्या पोलार्ड आणि कुलटर-नाईल यांच्यात नाबाद 50 धावांची भागीदारी झाली. पंजाब कडून शमी आणि अर्षदीपने प्रत्येकी 2, तर जॉर्डन आणि बिश्नोईने प्रत्येकी 1 बळी घेतला.

मुंबईने विजयासाठी दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ देखील 176 धावा करू शकला. अखेरच्या षटकात 9 धावा हव्या असताना पंजाबचा संघ 8 धावा करू शकला. शेवटच्या चेंडूवर जॉर्डन धावबाद झाल्याने सामना टाय झाला. तत्पूर्वी पंजाबचा कर्णधार के.एल. राहुलने सलग तिसरे अर्धशतक ठोकत 77 धावा केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या