IPL 2020 – मुंबई इंडियन्स पाचव्यांदा चॅम्पियन, दिल्ली कॅपिटल्सच्या स्वप्नांना सुरुंग

कर्णधार रोहीत शर्माची दमदार अर्धशतकी खेळी आणि ट्रेण्ट बोल्टच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएल जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने या स्पर्धेचे जेतेपद अगदी रूबाबात राखले. पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचणाऱया दिल्ली कॅपिटल्सच्या जेतेपद पटकावण्याच्या आशांना मात्र सुरुंग लागला.

दिल्ली कॅपिटल्सच्या 157 धावांचा पाठलाग करणाऱया मुंबई इंडियन्सने रोहीत शर्माच्या 68 धावांच्या खेळीच्या जोरावर अगदी सहज विजय मिळवला. रोहीत शर्माने आपल्या खेळीत चार षटकार व पाच चौकारांची आतषबाजी केली. त्याला क्विण्टॉन डी काॅक (20 धावा), सूर्यकुमार यादव (19 धावा) व इशान किशन (नाबाद 33 धावा) यांची उत्तम साथ लाभली. दरम्यान, त्याआधी कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद 65 धावा) व रिषभ पंत (56 धावा) यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 156 धावा फटकावल्या. ट्रेण्ट बोल्टने 30 धावा देत तीन फलंदाजांना बाद करीत मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

जेतेपद राखणारा चेन्नईनंतर दुसराच संघ

मुंबई इंडियन्सचा संघ जेतेपद राखणारा चेन्नई सुपरकिंग्सनंतरचा दुसरा संघ ठरला आहे. याआधी चेन्नई सुपरकिंग्सने 2010 व 2011 या सालांमध्ये आयपीएल जिंकण्याची करामत केली होती. आता मुंबई इंडियन्सने रोहीत शर्माच्या नेतृत्वात 2019 व 2020 सालांमध्ये ही स्पर्धा जिंकण्याचा करीष्मा करून दाखवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या