IPLमधील स्टार खेळाडूच्या गाडीचा महामार्गावर भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा

2346

29 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल-2020 ला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. जोफ्रा आर्चर, ग्लेन मॅक्सवेल हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलला जवळजवळ मुकणार आहे. अशातच क्रीडाप्रेमींसाठी आणखी एक मोठी बातमी वेस्ट इंडीजमधून आली आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या एका प्रमुख खेळाडूचा अपघात झाला आहे. राजस्थानचा पहिला सामना 2 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटवलेला वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओशन थॉमस याच्या गाडीला भीषण अपघात झाला. अपघात झाला तेव्हा थॉमस स्वत: ड्रायव्हिंग करत होता. थॉमसच्या ऑडी कारने दुसऱ्या एका गाडीशी धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की थॉमसची गाडी पलटी झाली. अपघातानंतर थॉमसला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृति सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

oshane-thomas

थॉमसने गेल्या महिन्यात आयर्लंडविरुद्ध अखेरचा एक दिवसीय सामना खेळला होता. परंतु त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. वेस्ट इंडिजकडून थॉमसने 20 एक दिवसीय सामने खेळले असून यात त्याच्या नावावर 27 बळींची नोंद आहे, तर 10 टी-20 लढतींमध्ये त्याने 9 विकेट घेतल्या आहेत.

राजस्थानचा प्रमुख खेळाडू!
आयपीएलच्या 13 व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. ओशन थॉमस राजस्थान रॉयल्सच्या संघात आहे. रविवारी त्याच्या गाडीला झालेल्या अपघातामुळे राजस्थानपुढील डोकेदुखी वाढली आहे. राजस्थानने 50 लाखांच्या बेस प्राईज असलेल्या थॉमसला दीड कोटींना खरेदी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या