बंगळुरूसमोर मुंबईचे आव्हान, कोण बाजी मारणार?

आयपीएलमधील बहुप्रतीक्षित लढत दुबई येथे रंगणार आहे. चार वेळा चॅम्पियन ठरणारा मुंबई इंडियन्स व स्टार खेळाडूंनी सजलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना होणार असून याप्रसंगी रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या नेतृत्वगुणांचा कस लागेल हे निश्चित. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक विजय व एका पराभवासह दोन गुणांची कमाई केलीय. आता उद्या दुसऱया विजयाला गवसणी घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसतील. या हायव्होल्टेज लढतीत कोण बाजी मारेल याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

सूर्या, सौरभ यांच्यापैकी एकालाच घ्यायला हवे

मुंबई इंडियन्सच्या संघाने मागील लढतीत रोहित शर्माच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला हरवले. सूर्यकुमार यादवची त्याला उत्तम साथ लाभली. सूर्यकुमार यादव व सौरभ तिवारी या दोन्ही खेळाडूंकडे आक्रमक फलंदाज म्हणून बघितले जात नाही. त्यामुळे मधल्या फळीत दोन्ही खेळाडूंना संधी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल क्रिकेटमधील दिग्गजांकडून विचारला जात आहे.

विराट, डिव्हिलीयर्स, फिंच या त्रिकुटाकडून अपेक्षा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार विराट कोहली, स्टार खेळाडू ए. बी. डिव्हिलियर्स व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंच या त्रिकुटावर असणार आहे. देवदत्त पडीकल याने पहिल्या लढतीत चांगली कामगिरी केली असली तरी त्याने आपल्या प्रदर्शनात सातत्य आणायला हवे. अन्यथा त्याचा पुढचा मार्ग खडतर असेल.

हार्दिक पांडय़ावर नजरा

हार्दिक पांडय़ा दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आयपीएलद्वारे त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. पण पहिल्या दोन लढतींत त्याला आपली चमक दाखवता आलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने हार्दिक पांडय़ाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. उद्याच्या लढतीतही त्याच्या कामगिरीवर साऱयांच्या नजरा असणार आहेत.

स्टेन, उमेशचे काय होणार?

डेल स्टेन व उमेश यादव या दोन्ही अनुभवी गोलंदाजांना पहिल्या दोन्ही लढतींत आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे त्यांना आणखी संधी देण्यात येईल असे वाटत नाही. युजवेंद्र चहल हा फिरकी गोलंदाजीची धुरा व्यवस्थित सांभाळतोय. नवदीप सैनी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडूनही अपेक्षा बाळगल्या जात आहेत. यष्टिरक्षक जोश फिलीप याला अद्याप फलंदाजीत यश मिळवता आले नाही. मोईन अली, पार्थिव पटेल, ऍडम झाम्पा हे बेंचवर बसून आहेत. बघूया या खेळाडूंना केव्हा संधी मिळते ती…

बुमराह, बोल्ट, पॅट्टीनसन गोलंदाजीतील हीरो

मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी विभाग शानदार आहे. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्टसारखे मॅचविनर गोलंदाज या संघात आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅट्टीनसनमुळे या विभागाला आणखी धार आलीय. राहुल चहर, कृणाल पांडय़ा, हार्दिक पांडय़ा व कायरॉन पोलार्ड या चौघांनी जसप्रीत बुमराह, ट्रेण्ट बोल्ट व जेम्स पॅट्टीनसन यांना साथ दिल्यास मुंबई इंडियन्सला रोखणे इतर संघांसाठी मुश्कील असेल.

आजची लढत

मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई

रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या